आशियाचा राजा कोण? आजपासून आशिया कप क्रिकेटचा थरार

बहुचर्चित आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार मंगळवारपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली होणाऱया या स्पर्धेत एकूण आठ संघ झुंजणार असून आशियाचा राजा कोण याचा फैसला लावला जाणार आहे.

सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आलेली आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना अबुधाबीत अफगाणिस्तान अन् हाँगकाँग यांच्यातील लढतीने रंगणार आहे.

टीम इंडिया 10 सप्टेंबरला यूएईविरुद्धच्या लढतीने स्पर्धेतील आपल्या मोहिमेस प्रारंभ करील. सलामीच्या लढतीत दमदार विजय मिळवून स्पर्धेचा धडाकेबाज श्रीगणेशा करण्याचा हिंदुस्थानी खेळाडूंचा इरादा असेल. आशिया कप स्पर्धेत हिंदुस्थानची कामगिरी नेहमीच उत्तम राहिलेली आहे. यावेळीही टीम इंडिया जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानली जात असल्याने इतर संघांसाठी त्याला पराभूत करणे मोठे आव्हान ठरणार आहे.

टीम इंडियाचा दरारा

टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक आठ वेळा विजेतेपदावर नाव कोरण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये सात वेळा वनडे स्वरूपात आणि एकदा (2016 मध्ये) टी-20 स्वरूपातील झळाळता करंडक हिंदुस्थानी संघाने उंचावलेला आहे. त्यामुळे यंदा नवव्या विजेतेपदाची संधी टीम इंडियासमोर आहे. पुढील साडेचार महिन्यांनंतर हिंदुस्थान-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली टी-20 वर्ल्ड कप होणार असल्याने उद्यापासून सुरू होणाऱया आशिया चषक स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अफगाणिस्तान-हाँगकाँग लढतीने होणार स्पर्धेचा शंखनाद …तर हिंदुस्थान-पाकिस्तान तिसऱ्यांदा भिडणार!

आशिया कप स्पर्धेतील 8 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये या स्पर्धेत तीन वेळा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उभय संघ एकाच गटात असल्याने गट फेरीनंतर सुपर-4 फेरीतही हिंदुस्थान-पाकिस्तान आमने-सामने येऊ शकतात. अपेक्षेनुसार हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात लीगनंतर सुपर-4मध्ये पुन्हा सामना होऊ शकतो. सर्व काही सुरळीत पार पडले तर अंतिम सामन्यात तिसऱयांदा पुन्हा एकदा या दोन कट्टर संघांमध्ये विजेतेपदाचा हायव्होल्टेज सामना बघायला मिळू शकतो.

हिंदुस्थानचे सामने

  • 10 सप्टेंबर – यूएईविरुद्ध
  • 14 सप्टेंबर – पाकिस्तानविरुद्ध (हायव्होल्टेज सामना)
  • 19 सप्टेंबर – ओमानविरुद्ध

आजचा सामना

  • अफगाणिस्तान वि. हाँगकाँग
  • रात्री 8 वाजता
  • शेख स्टेडियम अबू धाबी आनंदित

Comments are closed.