Asia Cup: पाकिस्तानवर आयसीसीची कारवाई होणारच, यूएईच्या सामन्यापूर्वी केला होता ड्रामा

टी20 आशिया कप 2025 मध्ये 17 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि यूएई यांच्यात सामना खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना 41 धावांनी जिंकला, मात्र सामन्यापूर्वी मोठा गोंधळ झाला. ठरलेल्या वेळेत पाकिस्तानची टीम हॉटेलमधून मैदानावर आली नाही. त्यांनी सामना रेफरी अँडी पायकॉफ्ट यांना आशिया कपमधून हटवण्याची मागणी केली होती. पण आयसीसीने ही मागणी धुडकावून लावली. शेवटी पाकिस्तानने सामना खेळण्यासाठी मैदान गाठले, पण आता आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मेल पाठवून खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्राशी (PMOA) संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी पीसीबीला पत्र लिहून ‘वारंवार नियम मोडल्याबद्दल’ जबाबदार धरले आहे.

इशारे देऊनही पाकिस्तानकडून मीडिया मॅनेजर नईम गिलानी यांना सामना सुरू होण्याआधी झालेल्या बैठकीत (सलमान अली आगा, कोच माईक हेसन आणि रेफरी पायकॉफ्ट यांच्यातील) नेण्यात आले. नियमांनुसार मीडिया मॅनेजरना अशा बैठकीत हजेरी लावण्याची परवानगी नाही. तरीही पीसीबीने जिद्दीने त्यांना नेलं आणि बैठक चित्रित करण्यावर आग्रही राहिला.

मीडिया मॅनेजर मोबाईलसह PMOA क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं. त्यानंतर पीसीबीने सामन्यातून माघार घेण्याची धमकी दिली आणि बैठक ‘बिनआवाज’ फिल्मवण्यावर आग्रही राहिले. हेही नियमांचे उल्लंघन ठरले. शिवाय त्या फुटेजचा वापर कसा होणार, याची माहितीही आयसीसीला देण्यात आली नाही.

याशिवाय पीसीबीच्या प्रेस रिलीजमध्ये पायकॉफ्ट यांनी ‘माफी मागितली’ असल्याचा दावा करण्यात आला. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त गैरसमजाबद्दल खेद व्यक्त केला होता. या सर्व प्रकारांवर आयसीसीने नाराजी व्यक्त केली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डविरोधात कारवाईची तयारी सुरू आहे.

Comments are closed.