Asia Cup 2025 – हिंदुस्थान-श्रीलंका सामन्यात विक्रमांचा पाऊस!
सुपर ओव्हरपर्यंतच्या लढतीत हिंदुस्थानने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, या थरारक लढतीत विक्रमांचाही पाऊस पडला. हिंदुस्थानी संघाने सलग सहाव्यांदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. टी-२० क्रिकेटमधील टायब्रेकरमध्ये कधीही पराभव न पत्करणारा हिंदुस्थान हा एकमेव संघ होय.
हिंदुस्थानने आजपर्यंत सात टाय सामने खेळले असून, प्रत्येकवेळी टायब्रेकर जिंकला आहे. यातील पहिला सामना २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ‘बॉ ल आऊट’ने जिंकला होता. उर्वरित सर्व सहा वेळा ‘टीम इंडिया’ने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारलीय.
अभिषेक शर्मा आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ६ डावांत ३०९ धावा करत हा विक्रम आपल्या नावे केला. याआधी २०२२ मध्ये मोहम्मद रिजवानने २८१ आणि विराट कोहलीने २७६ धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्माचे २५ चेंडूंच्या आत सहाव्यांदा अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरुद्ध २५ चेंडूंत फिफ्टी ठोकली. हिंदुस्थानसाठी सर्वाधिक ७ अर्धशतके सूर्यकुमार यादवच्या नावावर आहेत.
अभिषेकने सलग ७ डावांत ३०हून अधिक धावा करत रोहित शर्मा व मोहम्मद रिजवानची बरोबरी केली.
अभिषेक शर्माने सलग तीन डावांत अर्धशतके ठोकून कोहली, राहुल, सूर्यकुमार, रोहित शर्मा, श्रेयस यांच्या क्लबमध्ये स्थान मिळविले.
आशिया चषकात ३००हून अधिक धावा करणारा अभिषेक शर्मा हा दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला. त्याने ६ डावांत ३०९ धावा करत कोहलीनंतर हा टप्पा गाठला.
आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानने २०२ धावसंख्या उभारून यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
हिंदुस्थानच्या कुलदीप यादवने ६ डावांत १३ बळी घेत एकाच हंगामात सर्वाधिक बळी टिपण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
Comments are closed.