आशिया कप 2025 : टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? संजू सॅमसनला आव्हान देणारी ही दोन नावे
पुढील महिन्यात यूएईमध्ये आशिया कप टी20 स्वरूपात खेळला जाणार आहे. टीम इंडियाची नजर हा किताब आपल्या नावावर करण्यावर आहे. पुढील वर्षी टी20 वर्ल्ड कप होणार असल्याने या वेळी आशिया कपही टी20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र निवड समितीसमोर मोठा पेच आहे तो म्हणजे दोन विकेटकीपरांची निवड.
रिषभ पंतला सध्या टी20 संघासाठी विचारात घेतले जात नाही हे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत आता प्रश्न असा आहे की पंत नाही तर मग कोण? या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले नाव आहे संजू सॅमसनचे. भारतासाठी अलीकडच्या टी20 मालिकांमध्ये दमदार खेळ दाखवणारा संजू या फॉरमॅटमध्ये मोठं नाव आहे आणि धडाकेबाज फलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे.
आशिया कपसाठी संजूची निवड जवळपास निश्चित मानली जाते. पण दुसऱ्या विकेटकीपर म्हणून कोणाला संधी मिळेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या शर्यतीत दोन नावे चर्चेत आहेत. दोघांनीही टीम इंडियासाठी आधी खेळले असून आयपीएलमध्येही आपल्या हिटिंग क्षमतेची छाप पाडली आहे.
पहिलं नाव आहे जितेश शर्माचं. पंजाब किंग्जकडून खेळताना जितेशने भरपूर धावा केल्या तसेच फिनिशरची भूमिकाही उत्तम पार पाडली. गेल्या आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला आणि या संघाला किताब जिंकून देण्यात त्याच्या फिनिशिंग क्षमतेचा मोठा वाटा होता. विकेटकीपिंगसोबतच खालच्या क्रमावर जलद धावा करण्याची ताकद जितेशकडे आहे. त्यामुळे दुसऱ्या विकेटकीपरच्या शर्यतीत त्याचे नाव सर्वात पुढे आहे. म्हणजेच संजू आणि जितेश या जोडीची निवड जवळपास ठरलेली दिसते.
जितेशशिवाय अजून एक नाव दुसऱ्या विकेटकीपरच्या शर्यतीत आहे. तो म्हणजे संजू सॅमसनच्या कर्णधारपदाखाली राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ध्रुव जुरेल. जुरेलला कसोटीध्येही दुसऱ्या विकेटकीपर म्हणून संधी मिळाली आहे. टी20 फॉरमॅटमध्येही तो या यादीत आहे. सामना फिनिश करण्याची क्षमता त्याच्यात आहे, आणि आयपीएलमध्ये त्याने राजस्थानसाठी ही भूमिका यशस्वीपणे निभावली आहे.
Comments are closed.