भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू सुपर फ्लाॅप, संघाची चिंता वाढली!
पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणार आहे. मात्र, त्याआधीच त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत केवळ 160 धावा केल्या. एका टप्प्यावर असं वाटत होतं की पाकिस्तानी फलंदाज सहज 180 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करतील, परंतु शेवटच्या षटकांत ते जलद गतीने धावा करण्यात अपयशी ठरले. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजांच्या स्ट्राइक रेटवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानकडून केवळ मोहम्मद हारिसनेच चांगली कामगीरी केली. त्याने 43 चेंडूत दमदार 66 धावा केल्या. मात्र, त्याशिवाय इतर कोणताही फलंदाज 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. ओमानच्या गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळण्याचा पाकिस्तानी फलंदाजांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ही पाकिस्तानसाठी मोठी चिंता ठरली आहे, कारण त्यांना जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांसारख्या धडाकेबाज गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांच्या संथ स्ट्राइक रेटवर टीका होत असताना मोहम्मद हारिसने आपल्या संघाची बाजू उचलून धरली. त्याने स्पष्ट केलं की पाकिस्तान संघाकडे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे आणि याआधी त्यांनी ते सिद्धही केलं आहे. हारिस म्हणाला, बांग्लादेशमध्ये (ढाका) आम्ही 180 धावा केल्या, जिथं याआधी कोणतीही टीम ते करू शकली नव्हती. वेस्ट इंडिजमध्येही आम्ही 180 धावा केल्या आणि शारजाहमध्ये 200 धावांचा टप्पा गाठला. यूएईमध्ये पाकिस्तानने याआधी कधीही 200 धावा केल्या नव्हत्या, पण आम्ही ते करून दाखवलं.
Comments are closed.