हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानच्या कॅप्टनचा आणखी एक निर्णय, सलमान आगानं नेमकं काय केलं?
दुबई: भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरला आमने सामने आले होते. त्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 7 विकेटनं पराभूत केलं होतं. मात्र, भारतीय संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन न केल्यानं वाद निर्माण झाला होता. पाकिस्ताननं त्या विरोधात आशिया क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली होती. तर, आयसीसीकडे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली होती. मात्र, आयसीसीनं पीसीबीची मागणी फेटाळून लावली होती. यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला होता. भारताविरुद्ध झालेल्या पराभवातून पाकिस्तानचा संघ अद्याप सावरलेला नाही. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा यानं मोठा निर्णय घेतला. संयुक्त अरब अमिरात विरुद्धच्या मॅचपूर्वीच्या परिषदेला उपस्थित राहणं सलमान आगानं टाळलं आहे.
संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तान उद्या आमने सामने येणार आहेत. त्यापूर्वी पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा याला पत्रकार परिषद घ्यायची होती. मात्र, कोणतंही कारण न देता रद्द करण्यात आली आहे. मिडिया रिपोर्टसनुसार पाकिस्तान टीम मॅचपूर्वी सराव करणार आहे. पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी संयुक्त अरब अमिरातला पराभूत करावं लागेल. भारत अ गटातून यापूर्वीच सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे.
रविवारी भारत आणि पाकिस्तान सामना पार पडला. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसोबत हस्तांदोलन केलं नव्हतं. यानंतर खवळलेल्या पीसीबीनं आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. या प्रकरणाला सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरत आयसीसीकडे तक्रार केली होती.पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगा याला मॅच दरम्यान हस्तांदोलन करु नका असं सांगितल्याचा दावा होता. सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांनी जाणीवपूर्वक भारतीय संघाची साथ दिल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. मात्र, आयसीसीनं चौकशी करत पाकिस्तानची मागणी फेटाळली होती.
आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान अ गटात आहे. ओमानची टीम सुपर 4 च्या रेसमधून बाहेर पडली आहे. कारण त्यांचा दोन सामन्यात पराभव झाला आहे. टीम इंडियानं सलग दोन सामने जिंकत सुपर फोरमध्ये प्रवेश केला होता.
पाकिस्तान आणि यूएईनं आतापर्यंत एक एक मॅच जिंकली आहे. तर, त्यांना एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतानं पाकिस्तान आणि यूएईला पराभूत केलं आहे. जर, पाकिस्ताननं यूएई विरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला तर ते स्पर्धेबाहेर जातील. यूएईला दोन गुण मिळतील आणि ते 4 गुणांसह सुपर 4 मध्ये दाखल होतील.
आणखी वाचा
Comments are closed.