Asia Cup 2025: फक्त श्रेयस अय्यरच नव्हे, या 5 भारतीय खेळाडूंवरही झाला अन्याय
यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात शुबमन गिलची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बराच काळानंतर पुन्हा या छोट्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. कुलदीप यादवलाही संधी मिळाली आहे. मात्र संघ जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती श्रेयस अय्यरच्या नावाची. उत्तम फॉर्ममध्ये असूनही अय्यरला संघात स्थान मिळाले नाही. त्याच्यासोबत काही असे खेळाडूही आहेत, जे संघात स्थान मिळवण्यास पात्र होते, पण त्यांना दुर्लक्षित करण्यात आले.
श्रेयस अय्यर
टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत ज्याची निवड नक्की मानली जात होती तो म्हणजे श्रेयस अय्यर. गेल्या वर्षभरात त्याने अप्रतिम खेळ केला. 2024 मध्ये केकेआरला कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर यंदा त्याने पंजाबला फायनलपर्यंत पोहोचवले. वैयक्तिक कामगिरीही उत्कृष्ट राहिली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्या बॅटमधून सतत धावा आल्या. तरीदेखील अय्यरला आशिया कपच्या संघात जागा मिळाली नाही आणि त्यामुळे बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
यशस्वी जयस्वाल
संघातून बाहेर राहिलेलं दुसरं मोठं नाव म्हणजे यशस्वी जयस्वाल. गेल्या वर्षभरापासून त्याला टी20 संघात संधी मिळत नव्हती. मात्र आयपीएल 2025 मध्ये त्याने 6 अर्धशतकी खेळींसह 559 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 160 होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने जबरदस्त फलंदाजी केली. तरीदेखील मुख्य संघात त्याला संधी न मिळता फक्त राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. अजीत आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “यशस्वीला 15 जणांच्या संघात संधी मिळाली नाही, हे निराशाजनक आहे, पण त्याला थोडं थांबावं लागेल.”
वॉशिंग्टन सुंदर
ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याला वगळण्यात आले. अजीत आगरकर यांनी सांगितले की संघाच्या संतुलनामुळे सुंदरसाठी जागा तयार करता आली नाही. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन लेग स्पिनर आहेत, तसेच अक्षर पटेल फिरकीसह फलंदाजीही करतो. त्यामुळे सुंदरऐवजी रिंकू सिंगला एक अतिरिक्त फलंदाज म्हणून निवडण्यात आले.
युझवेंद्र चहल
युझवेंद्र चहलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येण्याची शक्यता आता फारच कमी वाटत आहे. त्याची पुन्हा एकदा उपेक्षा झाली. 35 वर्षीय चहलने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. 2024 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता, पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आयपीएल 2024 मध्ये त्याने 18 तर यंदा 16 विकेट घेतल्या, तरीही राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाली नाही.
मोहम्मद सिराज
सिराजला संघात स्थान न मिळाल्याने निवड समितीवर सोशल मीडियावर टीका होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने सर्व सामने खेळले होते. त्यानंतर आशिया कपपूर्वी त्याला महिनाभरापेक्षा जास्त विश्रांतीही होती. कसोटीत त्याची कामगिरी उत्तम राहिली असली तरी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याला फारशा संधी मिळालेल्या नाहीत. 2017 मध्ये पदार्पण करूनही त्याने केवळ 16 टी20 सामने खेळले आहेत.
Comments are closed.