आशिया कप 2025चं यजमानपद यूएईकडे!टीम इंडिया खेळणार की नाही, जाणून घ्या सविस्तर

भारत आणि पाकिस्तानमधील खराब संबंधांमुळे आशिया कप 2025 चे भविष्य स्पष्ट दिसत नाहीये. सध्या बीसीसीआयला टीम इंडियाने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळू नये असे वाटत आहे. दरम्यान आशिया कप 2025 बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. नवीन वृत्तांनुसार, आशियाई क्रिकेट परिषद ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करू शकते. या प्रकरणात, मोठा प्रश्न असा आहे की टीम इंडिया या स्पर्धेचा भाग होईल की नाही?

फोर्ब्सच्या एका नवीन वृत्तानुसार, जर सर्व काही व्यवस्थित राहिले तर आशिया कप 2025 यूएईमध्ये होऊ शकतो. तथापि, टीम इंडियाचा भाग होण्याबाबत अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी आशिया कप बीसीसीआय आयोजित करणार आहे, परंतु पाकिस्तान संघामुळे तो यूएईमध्ये होऊ शकतो. सध्या एसीसीचे अध्यक्ष हे पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत. ज्यामुळे या स्पर्धेच्या भविष्याबद्दल मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकारी आशा व्यक्त करत आहेत की बीसीसीआय या स्पर्धेतून आपले नाव मागे घेणार नाही. तरीदेखील बीसीसीआयने अद्याप यावर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.

2023 चा आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार होता. मात्र, भारतीय संघामुळे अर्धी स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यात आली. 2023 चा आशिया कप एकदिवसीय विश्वचषकामुळे एकदिवसीय स्वरूपात खेळवण्यात आला. यावेळी आशिया कप 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी खेळवला जाईल. त्यामुळे तो टी-20 स्वरूपात होणार आहे. पण, बीसीसीआय सध्या आशिया कपमध्ये रस दाखवत नाही, त्यामुळे मोहसिन नक्वी यांच्या समस्या वाढल्या आहेत.

Comments are closed.