भारतात आशिया कप ट्रॉफी कधी येणार? मोहसीन नक्वींची आडमुठी भूमिका कायम,बीसीसीआयचा नवा प्लॅन


नवी दिल्ली : आशिया कप फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवलं. आशिया कपची फायनल 28 सप्टेंबरला झाली होती. भारतानं पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत करत विजेतेपद मिळवलं. मात्र, टीम इंडियानं आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानातून निघून गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत भारताला आशिया कपची ट्रॉफी मिळालेली नाही. याच एक कारण म्हणजे मोहसीन नक्वी त्यांच्या हस्ते ट्रॉफी भारताच्या प्रतिनिधीकडे देण्यास ठाम आहेत. आता बीसीसीआयनं ट्रॉफी स्वीकारण्यासाठी विशेष प्लॅन तयार केला आहे.

Asia Cup Trophy Controversy: आशिया कपची ट्रॉफी भारतात कशी येणार?

रिपोर्टनुसार बीसीसीआय आशिया कपची ट्रॉफी मिळवण्यासाठी हा विषय आयसीसीसमोर मांडणार आहे.  इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार  बीसीसीआय पुढील महिन्यात दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत आशिया कप ट्रॉफी वादाचा मुद्दा मांडतील. आयसीसीची बैठक  4 ते 7 नोव्हेंबरला दुबईत होणार आहे. आयसीसीचे इतर सदस्य देश या बैठकीत भारताच्या भूमिकेचं समर्थन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

30 सप्टेंबरला आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वींच्या कृतीचा विरोध केला. राजीव शुक्ला  यांनी आशिया कपची ट्रॉफी ही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नसल्याचं म्हटलं होतं. ट्रॉफीचा खरा दावेदार भारतीय संघ असल्याचं शुक्लांनी म्हटलं होतं.

ट्राफी स्वत: देण्यावर नक्वी ठाम

आशियाई क्रिकेट परिषद आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आशिया कप 2025 ची ट्रॉफी एसीसीच्या ऑफिसमध्ये असल्याचं म्हटलं. बीसीसीआयच्या कोणत्यातरी अधिकाऱ्यानं किंवा टीम इंडियाच्या खेळाडूनं एसीसीच्या कार्यालयात यावं आणि माझ्या हातून ट्रॉफी घेऊन जावं, अशी नक्वींची भूमिका आहे. बीसीसीआयनं हा प्रस्ताव देखील फेटाळला आहे. सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबई येथील आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात ठेवली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.