मोहसीन नक्वीचं नवं नाटक, BCCI च्या कोणत्याही प्रतिनिधीला ट्रॉफी देणार, भारत ICC कडे जाणार


नवी दिल्ली : भारतानं आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला तीनवेळा पराभूत केलं होतं. भारतानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषकाची ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. बीसीसीआयनं आशियाई क्रिकेट परिषदेला ट्रॉफी मागणारं पत्र लिहून देखील मोहसीन नक्वीनं नकार दिला आहे. मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईत येऊन त्यांच्या हातून ट्रॉफी घ्यावी असं म्हटलंय. बीसीसीआयनं हा प्रस्ताव फेटाळला आहे. आता बीसीसीआय हा मुद्दा आयसीसीच्या बैठकीत मांडणार आहे. आशिया चषकाच्या ट्रॉफीच्या प्रकरणात भारताला श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा पाठिंबा  मिळाला आहे.

मोहसीन नकवी नवीन प्रस्ताव : मोहसीन नकवीचा नवा प्रस्ताव

आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या एका सूत्राच्या माहितीनुसार मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईच्या एसीसीच्या मुख्यालयात येऊन ट्रॉफी घेऊन जावं, असं म्हटलं. मात्र, बीसीसीआयनं तो प्रस्ताव नाकारला आहे. बीसीसीआय हा मुद्दा आयसीसीकडे नेणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसआयचे सचिव, बीसीसीआयचे एसीसी प्रतिनिधी राजीव शुक्ला आणि श्रीलंका क्रिकेट आणि अफगाणिस्तान सह इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषदेला भारताला ट्रॉफी द्यावी असं पत्र दिलं होतं. मात्र, बीसीसीआयकडून कोणीही यावं आणि दुबईतून त्यांच्याकडून ट्रॉफी घेऊन जावं, असं मोहसीन नक्वीकडून सांगण्यात आलं होतं. यामुळं या प्रकरणावर तोडगा निघालेला नाही. बीसीसीआयनं स्पष्ट केलं की ते मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. आता हा मुद्दा आयसीसीसमोर मांडण्याचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकतं.

आयसीसीचे अध्यक्ष बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह आहेत. आशिया कपची ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात आहे. फायनल जिंकल्यानंतर भारतानं मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळं मोहसीन नक्वी ग्राऊंडवरुन ट्रॉफी घेऊन गेले होते. मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. ते पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या सन्मानासाठी भारतीय क्रिकेटपटूंनी संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आशिया चषक जिंकल्यानंतर एमिरेटस क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. भारतानं आशिया कपमध्ये पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.