Asian Champions Trophy: 'सरपंच साब'च्या संघाची कमाल! चीनची भिंत तोडली, हॉकी इंडियाचा 5-2 ने विजय
पंजाबमध्ये सुरू असलेल्या पुरुष हॉकी संघांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारताने आपली विजयी मालिका सुरूच ठेवली आहे. गुरूवारी (२९ ऑक्टोबर) जालंधर येथे भारत आणि चीन समोरा-समोर आले. त्यामध्ये भारताने ५-२ असा विजय मिळवला. यजमान संघाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.
या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांची कामगिरी प्रभावी ठरला. दोघांनी प्रत्येकी २-२ गोल केले, तर जुगराज सिंगने एक गोल करून संघाच्या विजयात भर टाकली. या स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा १३-० असा मोठा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाने हाच फॉर्म कायम राखत चीनविरुद्ध आक्रमक सुरूवात केली. सामन्याच्या १२ व्या मिनिटालाच भारताच्या गोलचे खाते उघडले. सुखजीत सिंगने हा गोल केला.
चीननही काही मागे राहिला नाही. २६ व्या मिनिटाला यांग पेंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत आला. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.
मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू केला. २७ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्याने पुन्हा ३१ व्या मिनिटाला गोल केला. ३४ व्या मिनिटाला सुखजीतने त्याचा या सामन्यातील दुसरा गोल केला. त्यामुळे भारताची आघाडी ४-१ अशी वाढली.
चीनने आघाडी कमी करण्याचे काही प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वीही ठरले. ३६ व्या मिनिटाला चेन चोंगकॉंगने ड्रॅगफ्लिकद्वारे गोल करून सामना ४-२ असा केला.
चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराज सिंगने ४७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून भारताला ५-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने चीनला पुनरागमन करूच दिले नाही.
भारताचा या स्पर्धेत पुढील सामना ३० ऑक्टोबर रोजी जपानशी आहे.
Comments are closed.