Asian Games – हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाची फायनलमध्ये एन्ट्री; सुवर्णपदकाच्या आशा पल्लवीत, 44 वर्षांचा दुष्काळ संपणार?
Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने सुवर्णपदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. सेमी फायनलच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा 2-0 अशा फरकाने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाचा हा विजय ऐतिहासिक असून या विजयामुळे 44 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 1982 साली टीम इंडियाने सुवर्णपदक पटकावलं होतं. मात्र, त्यानंतर हिंदुस्थानच्या महिला संघाला सुवर्णपदक जिंकता आलं नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या या रणरागिणींकडून देशाला आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानचा सामना गतविजेत्या चीनविरुद्ध होईल
दक्षिण कोरियाविरुद्ध सामन्याचा विचार करता टीम इंडियाने सामन्याच्या सुरुवातीपासून सामन्यावर आपली पकड निर्माण केली होती. इशिका चौधरीने 44 व्या मिनिटाला आणि कर्णधार सलिमा टेटेने 48 व्या मिनिटाला गोल करत टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित केला. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी कडवी झुंद दिली. पहिल्या दोन क्वार्टर्समध्ये टीम इंडियाला तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु कोरियाच्या गोलरक्षक सियोयॉन ली आणि त्यांच्या मजबूत बचावामुळे टीम इंडियाला पूर्वार्धात गोल करण्यात यश आले नाही. मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये अवघ्या चार मिनिटांतच टीम इंडियाने दोन गोल करत सामना आपल्या खिशात घातला.
Comments are closed.