पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान : तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीमध्ये एकच टप्पा : 4 मे रोजी मतमोजणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली. 23 एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होईल. केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. सर्व राज्यांमधील एकंदर 824 जागांची मतमोजणी सोमवार, 4 मे 2026 रोजी होणार आहे. निवडणूक जाहीर होताच पाच राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी 4 वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमवेत सहआयुक्तही उपस्थित होते. मे महिन्यामध्ये मुदत संपत असलेल्या आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती याप्रसंगी देण्यात आली. पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 17.4 कोटी मतदार आणि 824 जागा असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. गेल्या 12 महिन्यांत निवडणूक आयोगाने पारदर्शकता आणण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबवल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. ‘एसआयआर’ची प्रक्रियाही योग्यपणे हाताळण्यात आली असून मतदारयादीत कोणताही अपात्र व्यक्ती राहू नये याची खात्री करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच मतदानाचा हक्क बजावताना केंद्राबाहेर मोबाईल फोन ठेवणे क्रमप्राप्त असून मतदानानंतर तो परत घेता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

2021 मध्ये पाचही राज्यांच्या निवडणुका 26 फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्या होत्या. मागीलवेळी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत, आसाममध्ये तीन टप्प्यात आणि तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्मचारी आणि सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर केवळ एक किंवा दोन टप्प्यातच मतदान घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अंदाजे 25 लाख निवडणूक अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच 8.5 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आल्याचेही मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केले.

सहा राज्यांमधील आठ जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह, इतर अनेक राज्यांमध्ये पोटनिवडणुकाही होणार आहेत. गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि नागालँडमधील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. गोवा, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा येथील पाच जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्र आणि गुजरातमधील तीन जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांची मतमोजणीही 4 मे रोजीच केली जाणार आहे. महाराष्ट्रात बारामती मतदारसंघाचा समावेश आहे, जिथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार होते. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथेही पोटनिवडणूक होईल.

पाच राज्यांमध्ये एकूण 17.4 कोटी मतदार

पाच राज्यांमध्ये 824 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यावेळी पाच राज्यांमध्ये एकूण 17.4 कोटी मतदार मतदान करतील. आसाममध्ये एकूण 2.5 कोटी मतदार असून पश्चिम बंगालमध्ये 6.44 कोटी मतदार आपला हक्क बजावू शकतील. या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि देखरेख मजबूत करण्यासाठी आयोगाकडून सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के वेबकास्टिंगची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.

आयोगाकडून वर्षभरात अनेक प्रयोग

गेल्या वर्षभरात निवडणूक आयोगाने पारदर्शकता आणण्यासाठी अनेक नवीन प्रयोग केले. पहिला एसआयआर होता, ज्याने मतदारयादीत कोणताही अपात्र व्यक्ती राहणार नाही याची खात्री केली. दुसरे म्हणजे, मतदान केंद्राबाहेर मोबाईल फोन ठेवले जातील. मतदान केल्यानंतर ते परत मिळवता येतील. एका मतदान केंद्रात 1,200 पेक्षा जास्त मतदार नसतील. निवडणूक संबंधित सर्व माहिती, ज्यामध्ये एपिक कार्ड आणि उमेदवारांची शपथपत्रे यासंबंधीची माहिती एका अॅपवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

तरुणांना मतदान करण्याचे आवाहन

निवडणूक आयुक्तांनी तरुणांना आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे सांगताना तुमचे मत ही तुमची निवड आहे, जी भविष्य घडवेल. भारतातील निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असल्याचे ते म्हणाले.

तामिळनाडूमध्ये सर्वाधिक मतदार वगळले

निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांमधील एसआयआर नंतर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक मतदार वगळण्यात आले आहेत. 27 ऑक्टोबर 2025 रोजी  एसआयआर प्रक्रिया सुरू झाली तेव्हा राज्यात एकूण 6,41,14,587 मतदार होते. सुमारे चार महिने चाललेल्या एसआयआरमध्ये 74,07,207 लोकांना वगळण्यात आले. आता तामिळनाडूत 5,67,07,380 मतदार नोंदणीकृत आहेत. पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर असून सुमारे 58 लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर केरळमध्ये 8 लाख, आसाममध्ये 2 लाख आणि पुद्दुचेरीमध्ये एसआयआर प्रक्रियेनंतर सर्वात कमी 77 हजार लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.

824 जागांसाठी महासंग्राम

राज्याच्या एकूण ठिकाणी मतदानाची तारीख

पश्चिम बंगाल               294                            23 आणि 29 एप्रिल

तामिळनाडू                  234                                 23 एप्रिल

केरळ                       140                                      9 एप्रिल

आसाम 126 9 एप्रिल

पुद्दुचेरी                     30                                         9 एप्रिल

सर्व राज्यांमधील मतमोजणी : सोमवार, 4 मे 2026

पश्चिम बंगाल         – एकूण जागा 294

पहिला टप्पा            : 23 एप्रिल : 152 जागा

दुसरा टप्पा :            29 एप्रिल : 142 जागा

कोणत्या राज्यात किती मतदार?

पश्चिम बंगाल :              6.44 कोटी

तामिळनाडू :                5.67 कोटी

केरळ     :                  2.70 कोटी

आसाम: 2.50 कोटी

पुद्दुचेरी: 9.44 लाख

निवडणूक अधिकारी-कर्मचारी

निवडणूक कर्मचारी : 15 लाख

सुरक्षा कर्मचारी: 8.5 लाख

सूक्ष्म निरीक्षक : ४९ हजार

निवडणूक निरीक्षक : 1,444

मतमोजणी अधिकारी : 40 हजार

विभागीय अधिकारी : २१ हजार

मतमोजणी निरीक्षक : 15 हजार

महत्त्वाच्या नोंदी….

पाच राज्यांमध्ये 824 जागांसाठी निवडणुका होणार

एकूण 17.4 कोटी मतदार आपला हक्क बजावणार

आसाममध्ये 31,000 मतदान केंद्रे स्थापन करणार

मतमोजणीसाठी 40,000 कर्मचारी तैनात करणार

निवडणुकीसाठी 25 लाख अधिकारी काम करणार

8.5 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची तयारी

ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत छायाचित्र झळकणार

उमेदवारांची माहिती मोबाईल अॅपवर उपलब्ध असेल

…………….

Comments are closed.