सभागृहाचा सन्मान राखा; निलेश राणे यांना विधानसभा अध्यक्षांची समज

विधानसभेत आज शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव व आमदार नीलेश राणे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध झाले. शिंदे गटाचे सदस्य नीलेश राणे यांनी सभागृहात अरेतुरेची भाषा सुरू केल्यामुळे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव कमालीचे आक्रमक झाले. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी भास्कर जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव यांचा रुद्रावतार पाहून संपूर्ण सभागृह अवाक् झाले. अखेर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी, पक्षाच्या प्रतोदांनी नवीन सदस्यांना शिस्त शिकवा, अशा शब्दात शिंदे गटाला समज दिली.
विधानसभेच्या आजच्या कामकाजात तीस लक्षवेधी सूचनांचा समावेश केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यामुळे प्रत्येक सदस्याने कमीत कमी वेळेत आपले म्हणणे मांडा, अशी सूचना केली होती. त्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर आले होते. लक्षवेधीला सुरुवात झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जयंत पाटील उभे राहिले आणि एका दिवशी तीस लक्षवेधी सूचना घेतल्यावरून नियमांवर बोट ठेवले. एका दिवशी तीन लक्षवेधी सूचना मांडता येतात. आणि प्रत्येक लक्षवेधी सूचनेवर सदस्यांना बोलण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ दिला जातो पण एका दिवशी तीस लक्षवेधी सूचना मांडण्याची संधी देऊन तुम्ही कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करीत आहात, असा सवाल केला. आपण चार प्रस्ताव एकत्रित आणले आहेत. मग सदस्य बोलणार कधी, असा सवाल केला. यामध्ये सहभागी होताना शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणाले की, लक्षवेधी सूचना या एका मतदारसंघाच्या असतात. पण मागण्यांवरील चर्चा या सर्व राज्याच्या असतात. त्यामुळे तुम्ही एका दिवशी तीस लक्षवेधी सूचना कशा घेतल्या, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
भास्कर जाधव यांनी केलेल्या प्रश्नावर नीलेश राणे यांनी मागील बाकावरून काही तरी शेरेबाजी केली. त्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले आणि त्यांनी नीलेश राणे यांनी वापरलेल्या भाषेला आक्षेप घेतला. यामुळे जाधव व राणेंमध्ये प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर अरेतुरेवर वाद आला. शिवसेनेचे सर्व सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी हस्तक्षेप करीत सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
‘नवीन सदस्यांनी प्रतोदांकडून सन्मान शिकून घ्यावा’
योगेश सागर यांनी नीलेश राणे यांचे कान टोचत ‘नवीन सदस्यांनी या सभागृहाचा सन्मान कसा राखायचा हे आपल्या पक्षाच्या प्रतोदांकडून शिका, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे.’ अशा शब्दांत नीलेश राणे यांना सुनावले.
Comments are closed.