अंतराळवीर शुबन्सू शुक्ला भारतात परतला

विमानतळावर केंद्रीय मंत्र्यांनी केले स्वागत  : कुटुंबीयांची घेतली भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या स्वत:च्या ऐतिहासिक यात्रेनंतर रविवारी पहाटे मायदेशी परतले आहेत. शुभांशु शुक्ला हे मागील एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकासाठी राबविण्यात आलेल्या एक्सिओम-4 मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेत होते. दिल्ली विमानतळावर शुभांशु यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी स्वागत केले आहे. शुभांशु यांचे बॅकअप अंतराळवीर प्रशांत बालकृष्णन नायर देखील मायदेशी परतले आहेत.

अंतराळात पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले आहेत. भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे नासाच्या नेतृत्वाखालील एक्सिओम-4 मोहिमेत सामील होते. याच्या अंतर्गत ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. मोहीम पूर्ण केल्यावर ते पहिल्यांदाच रविवारी पहाटे भारतात परतले आहेत. विमानतळाबाहेर घोषणाबाजीने त्यांचे जोरदार स्वागत झाले आहे.

शुभांशु शुक्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर स्वत:च्या घरासाठी म्हणजेच लखनौसाठी रवाना होतील. शुभांशु हे 22-23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन सोहळ्यात भाग घेण्यासाठी दिल्लीत परतणार आहेत.

यापूर्वी शुभांशु यांनी शनिवारी इन्स्टाग्रामवर विमानात बसल्यानंतर स्वत:चे एक छायाचित्र पोस्ट केले होते. अमेरिकेतून बाहेर पडताना मनात संमिश्र भावना होत्या. माझा अनुभव देशवासियांसमोर मांडण्यासाठी भारतात परतण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. अंतराळ मोहिमेच्या तयारीदरम्यान मागील एक वर्षापासून माझे मित्र आणि परिवार ठरलेल्या लोकांना मागे सोडून येण्याचे दु:ख होत आहे, तर मोहिमेनंतर पहिल्यांदाच स्वत:चे मित्र, परिवार आणि देशवासियांना भेटण्यासाठी उत्साहित असल्याचे शुभांशु यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या क्षणाची प्रतीक्षा

माझा मुलगा मोहिमेत यशस्वी होत भारतात परतल्याचा मला मोठा आनंद आहे. त्याला लवकरात लवकर भेटण्याची आमची इच्छा आहे. याचमुळे आम्ही दिल्लीत पोहोचलो आहोत. आमच्या जीवनाचा हा स्मरणीय क्षण ठरणार असल्याचे उद्गार शुभांशुचे पिता शंभुदयाल शुक्ला यांनी काढले आहेत. आम्ही मागील एक महिन्यापासून शुभांशु कधी परतणार याची प्रतीक्षा करत होतो. आता तो परतल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोत, असे त्याची आई आशा शुक्ला यांनी म्हटले आहे.

संसदेत विशेष चर्चा

भारतीय अंतराळवीर शुभांशु यांच्या भारत वापसीच्या संबंधी केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचा पहिला अंतराळवीर : 2047 पर्यंत विकसित भारतासाठी अंतराळ कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका’ या विषयावर विशेष चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे

Comments are closed.