वयाच्या 53 व्या वर्षी हाॅलिवूडची अभिनेत्री तिसऱ्यांदा झाली आई, सोशल मीडियावर झाली ट्रोल
हॉलीवूड अभिनेत्री कॅमेरॉन डायझ आणि तिचा पती बेंजी मॅडेन यांनी नुकतीच त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्माची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर ही बातमी जाहीर करताना बेंजीने लिहिले की, त्यांना खूप आनंद, उत्साह आणि धन्यता वाटत आहे. नवजात बाळाचे नाव नोटस मॅडेन ठेवण्यात आले आहे. या जोडप्याच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोकांनी कॅमेरॉनच्या वयावर वाईट शब्दांमध्ये टीका करत तिला अनेकांनी म्हातारी म्हटले आहे. काहींनी तर या वयात बाळाला जन्म देणे हेच अन्यायकारक म्हटले आहे.
कॅमेरॉनने या नकारात्मक टीकांना सडेतोड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले. तिची मैत्रीण ग्वेनेथ पॅल्ट्रोच्या ‘गुप’ पॉडकास्टवर ती म्हणाली, “ही माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहे; हेच माझे संपूर्ण अस्तित्व आहे. गेल्या 10 वर्षांत म्हातारपणाची संपूर्ण संकल्पनाच पूर्णपणे बदलली आहे. मी उत्साही आहे आणि माझी अजून 50-60 वर्षे शिल्लक आहेत.” कॅमेरॉन आणि बेंजी यांची पहिली मुलगी, रॅडिक्स (6), हिचा जन्म 2019 मध्ये झाला, तर त्यांचा मुलगा, कार्डिनल (2), याचा जन्म 2024 मध्ये झाला आणि आता जन्माला आलेला मुलगा, या तिन्ही मुलांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
कॅमेरॉनला वयाची अजिबात चिंता नाही. ती म्हणते की आई झाल्यामुळे तिला अधिक शहाणपण आणि शांती मिळाली आहे. ती निरोगी जीवनशैली जगते, ‘ब्लू झोन डाएट’चे पालन करते, व्यायाम करते आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी आहार घेते. तिचे संपूर्ण आयुष्य आता तिच्या मुलांभोवती फिरते आणि ती कुटुंबाला आपले प्राधान्य मानते.
कॅमेरॉन म्हणते की बेंजीशी लग्न करणे ही तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट होती. कॅमेरॉनसाठी, मातृत्व हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आणि जीवनाचा उद्देश बनला आहे. ती म्हणते की तिचे ध्येय 107 वर्षे जगण्याचे आहे, जेणेकरून तिला आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवता येईल.
Comments are closed.