अतीशी दिल्लीत विरोधक बनतात
आप आमदारांच्या बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी या दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्या असणार आहेत. आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात रविवारी बोलाविण्यात आलेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. आतिशी या कालका मतदारसंघाच्या आमदार आहेत. मागील आप सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यावर त्यांनी मुख्यमंत्री पद भूषविले होते.. मुख्यमंत्री आतिशी यांनी काम केल्याने पक्षातील त्यांची प्रतिष्ठा देखील वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज सारखे पक्षाचे दिग्गज नेते पराभूत झाले. तर आतिशी या कालका मतदारसंघात विजयी झाल्या होत्या. पक्षामधील मजबूत महिला नेत्या म्हणून बैठकीत आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. आम आदमी पक्षाने महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमोर विरोधी पक्षाच्या वतीने महिला चेहरा म्हणून आतिशी यांना निवडले आहे. भाजपने शालीमार बागच्या आमदार रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी निवडले होते.
पराभवाची समीक्षा
दिल्ली निवडणुकीत पराभुत झाल्यावर आम आदमी पक्षात मंथन अन् समीक्षा सुरू आहे. पराभवाच्या कारणांचे तांत्रिक पैलू समजून घेण्यासाठी आम आदमी पक्ष लोकसभा, विधानसभा, जिल्हा अन् प्रभाग स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचे मूल्यांकनकरणार आहे. आता नव्या संघटनेत सर्व शाखांची पुनर्रचना केली जाणार आहे. पूर्ण दिल्लीत पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी रणनीति तयार करत काम केले जाणार असल्याचा दावा आप नेते गोपाल राय यांनी केला आहे.
Comments are closed.