अनुसूचित जातींवर अत्याचार होत आहेत.

मी लढणार त्यांची लढाई : राहुल गांधी

वृत्तसंस्था/ फतेहपूर

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी फतेहपूर येथील दिवंगत हरिओम वाल्मिकी यांच्या परिवाराची मोठ्या बंदोबस्तात भेट घेतली आहे.  पूर्ण देशात अनुसूचित जातीच्या समुदायावर अत्याचार होत असून मी त्यांची लढाई लढणार आहे. पीडित परिवाराला सन्मानजक मदतनिधी आणि न्याय मिळायला हवा आणि गुन्हेगारांवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल यांनी राज्य सरकारकडे केली आहे. रायबरेलीच्या ऊंचाहारमध्ये हरिओम वाल्मिकी हे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते.

आमचे सरकार नसल्याने मी फार काही करू शकत नाही. तरीही परिवाराला शक्य ती मदत करणार आहे. या परिवाराचे रक्षण केले जावे. परिवाराच्या सदस्यांवर प्रशासनाने माझी भेट न घेण्यासाठी दबाव टाकला होता असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी पीडित परिवाराला स्वत:चा संपर्क क्रमांक देत कुठलीही समस्या आल्यास थेट फोन करा, पूर्ण मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी राहुल यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते होते.

प्रथम हरिओम यांच्या परिवाराने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यास नकार दिला होता. यामुळे पोलिसांनी राहुल गांधींचा ताफा रोखला होता. परंतु नंतर परिवाराने राहुल गांधींची भेट घेण्यास होकार दर्शविला. त्यानंतर प्रशासनाने राहुल गांधींना संबंधित परिवाराची भेट घेण्याची अनुमती दिली. रायबरेलीत दलित युवक हरिओम वाल्मिकी याची जबर मारहाण करत हत्या करण्यात आली होती.

गुन्हेगारांवर कारवाई करा

हरिओम यांच्या परिवाराने कुठलीच चूक केलेली नाही. गुन्हेगार इतर लोक असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी हरिओम यांच्या परिवारासोबत बोललो, त्यांचे दु:ख जाणून घेतले. आम्ही शक्य ती सर्व मदत करणार आहोत. देशात जेथे कुठे दलितांच्या विरोधात अत्याचार होतील, काँग्रेस तेथे पोहोचून शक्य ती सर्व मदत प्रदान करेल आणि न्यायासाठी लढणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

मृत हरिओमच्या बहिणीला नोकरी

हरिओम हत्याप्रकरणानंतर राजकारण तापले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून निर्देश मिळाल्यावर जिल्हा प्रशासनाने त्वरित पाऊल उचलले आहे. मृत हरिओम वाल्मिकीची बहिण कुसुम देवी यांना वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्स म्हणून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले असून बहिणीला नोकरीही देण्यात आली आहे. काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी येथे राजकारण करण्यासाठी येऊ नये अशी आमची इच्छा असल्याचे हरिओमच्या भावाने म्हटले आहे.

 

Comments are closed.