सुवर्ण मंदिरावर हल्ला, 5 भक्त जखमी

वृत्तसंस्था / अमृतसर

शीखांचे पवित्र तीर्थस्थान असणाऱ्या सुवर्णमंदिरात हल्ल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीने लोखंडी कांबीने पाच भाविकांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी ‘नव नानकशाही दिन’ या पवित्र दिनी घडली आहे. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. प्रथमदर्शनी ही दहशतवादी घटना असल्याचे दिसून येत नसले, तरी सर्व शक्यता गृहित धरुन तपास करण्यात येणार आहे.

शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या आसपास सुवर्ण मंदिरातील रामदास निवास या वास्तूत एका शस्त्रधारी व्यक्तीने प्रवेश केला. त्याने तेथे उपस्थित असणारे भाविक आणि सेवादार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन भाविक आणि दोन सेवादार जखमी झाले. या पाचांपैकी एक भाविक आणि 1 सेवादार यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती शिरोमणी गुरद्वारा प्रबंधक समितीची सचिव प्रताप सिंग यांनी दिली. जखमींवर गुरु रामदास रुग्णालयात उपचार पेले जात आहेत.

हल्लेखोर ताब्यात

हल्ला करुन हल्लेखोराने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने त्याला आणि त्याच्या एका सहकाऱ्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शीखांच्या नववर्षाचा प्रारंभ साजरा करण्यासाठी सुवर्ण मंदिरात भारतातून आणि जगातून अनेक भाविक आलेले आहेत. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

कारस्थानाचा संशय

हल्लेखोराचे नाव जुलफान असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्याच्या परिचयाविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. हा हल्ला एका व्यापक कारस्थानाचा भाग असू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन मुख्य सूत्रधारांना पकडले जाईल, असे प्रतिपादन अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीतसिंग भुल्लर यांनी केले. हल्लेखोर हरियाणातील यमुनागरचा असल्याचे समजते.

गुन्हा दाखल

हल्लेखोर जुलफान आणि त्याच्या सहकारी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अनुच्छेद 118 (अ) आणि 115 (2) अनुसार गुन्हा सादर करण्यात आला आहे. सेवादार जसबीर सिंग याने दिलेल्या माहितीनुसार प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) सादर करण्यात आला असून पुढील चौकशी केली जात आहे.

Comments are closed.