म्हसळ्यात पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न, दुचाकीला कारने उडवले; दोन आरोपींना अटक
शहरातील पाभरे फाटा येथील नदी पुलाजवळ पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलीस कर्मचारी शौकत फरीद मुल्ला यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगेश गोरे (रा. रोहा) याच्यासह त्याच्या सहकाऱ्याला अटक केली. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
२६ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता पाभरे फाटा येथील नदी पुलावर पोलीस कर्तव्य बजावत होते. यावेळी मंगेश गोरे याने आपल्या एका साथीदारासह संगनमत करून पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याच्या उद्देशाने पोलीस शौकत मुल्ला यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत पोलीस मुल्ला जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजू सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासादरम्यान मंगेश गोरे याच्यासह त्याच्या सहकाऱ्याला अटक केली.
Comments are closed.