कोर्टरूमसेंड अभिप्रायात मुख्य न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला
सुनावणीवेळीच वकिलाने बूट फेकल्याने खळबळ : सनातन धर्मासंबंधी घोषणाबाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयातील कोर्टरुममध्येच एका वकिलाने सोमवारी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ खटल्यांची सुनावणी करत असताना ही घटना घडली. राकेश किशोर नामक वकिलांनी व्यासपीठाजवळ जाऊन आपला बूट काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, न्यायालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून वकिलाला दालनाबाहेर काढले. बार कौन्सिलने याप्रकरणी कडक पवित्रा घेत सरन्यायाधीशांवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांना निलंबित केले आहे. तसेच देशात कुठेही वकिली करण्याला बंदी घालताना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयात कोर्टरुममध्ये सुनावणी सुरू असतानाच सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बूटफेकीचा प्रकार घडल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. कोर्टरुममध्ये उपस्थित असलेल्या वकिलाकडून हा हल्ल्याचा प्रयत्न झाला. तथापि, बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तो ताबडतोब ताब्यात घेतला. तसेच संबंधित वकिलालाही दालनाबाहेर काढले. या घटनेनंतर सरन्यायाधीशांनी शांतता राखत कोर्टरुममध्ये उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले. उपस्थित वकिलांच्या म्हणण्यानुसार, कोर्टरुममधून बाहेर काढताना संबंधित वकिलाने ‘भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.’ अशाप्रकारच्या घोषणा दिल्याचे सांगण्यात आले.
विचलित होऊ नका, युक्तिवाद सुरू ठेवा!
आपल्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेवर सरन्यायाधीशांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. या सर्व गोष्टींमुळे विचलित किंवा अस्वस्थ होऊ नका. मीसुद्धा विचलित होणार नाही’ असे सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले. बूटफेकीच्या घटनेनंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. सरन्यायाधीशांच्या या स्पष्टोक्तीतून त्यांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने घेतल्याचे दिसून येत आहे.
सुरक्षा पथकाकडून घटनेची चौकशी सुरू
कोर्टरुममध्ये उपस्थित काही लोकांनी हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. वकिलीचा पेहराव घातलेल्या व्यक्तीने म्हणजेच वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर काहींनी हल्लेखोराने कागदाचा गोळा फेकल्याचे सांगितले. मात्र, संबंधित वकिलाला ताबडतोब न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा युनिटने घटनेची चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोर वकील असे का वागला? हे अद्याप कळलेले नाही.
सरन्यायाधीशांवर रोष का?
माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर कुमार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये त्यांची नोंदणी 2011 पासूनची आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या 7 फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील नाराज असल्याचे मानले जाते. 16 सप्टेंबर रोजी तोडफोड केलेल्या पुतळ्याच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पण्यामुळे सदर वकील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.