नागपूर दंगलीनंतर पोलीस अलर्ट मोडवर, औरंगजेबच्या कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कडक बंदोबस्त

औरंगजेब कबर प्रकरणावरून वादाला नागपुरात सोमवारी रात्री हिंसक वळण लागून दंगल उसळली. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत दुपारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादावादीने दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर आता खुलताबादमध्ये औरंगजेबच्या कबरीकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
औरंगजेब कबर प्रकरणावरून संपूर्ण देशभरात पडसाद उमटले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून मोर्चाही काढण्यात आला. यानंतर नागपूरात झालेल्या दंगलीमुळे खुलताबाद येथील औरंगजेब कबरीकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलीसांनी बँरीकेट लावले आहेत. राज्यात सध्या तणावाचे वातावरण झाल्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत.
दरम्यान, दर्गेत कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही कसून चौकशी केली जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची पोलीस चौकशी करत आहेत. तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, नंबर, आधारकार्ड तपासले जात असून त्यांची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात सुरू असलेल्या वातावरणामुळे पर्यटकांमध्ये घट पाहायला मिळत आहे. सोमवारी झालेल्या दंगलीमुळे मंगळवारी दुपारी 12 पर्यंत फक्त 9 पर्यटकांनी कबरीला भेट दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Comments are closed.