फक्त 11 दिवसांत ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडचे स्वप्न पुन्हा भंगले

अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने इंग्लंडचा 82 धावांनी पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींच्या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेत अ‍ॅशेस जिंकली. इंग्लंडसमोर विजयासाठी 435 धावांचे आव्हान होते, मात्र पाचव्या दिवशी इंग्लंडचा डाव 352 धावांवर आटोपला.

सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वच विभागात संघभावनेने कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये इंग्लंड अपयशी ठरला. पाचव्या दिवशी इंग्लंडने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी संयमी आणि अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने वळवला.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत 8 विकेट्सनी जिंकला होता. त्यानंतर दुसरी कसोटी चार दिवसांत 8 विकेट्सनी आपल्या नावावर केली. तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवसापर्यंत रंगला, मात्र अखेर विजय ऑस्ट्रेलियाच्याच पदरी पडला. केवळ 11 दिवसांत ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका जिंकत वर्चस्व सिद्ध केले.

इंग्लंड संघाला गेल्या आठ वर्षांपासून अ‍ॅशेस जिंकता आलेली नाही. त्यांनी अखेर 2017 साली ही प्रतिष्ठेची मालिका जिंकली होती. त्यानंतर सलग अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाच्याच ताब्यात आहेत. या मालिकेत इंग्लंडकडून केवळ जो रूटलाच शतक झळकावता आले. इतर फलंदाज सातत्य दाखवू शकले नाहीत आणि संघ एकसंध दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला.

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी एलेक्स कॅरी आणि ट्रॅव्हिस हेड हे विजयाचे नायक ठरले. पहिल्या डावात एलेक्स कॅरीने 106 धावांची शानदार शतकी खेळी करत संघाला 371 धावांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने 170 धावांची दमदार खेळी साकारली. या दोन खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभे केले.

इंग्लंडकडून पहिल्या डावात 286 तर दुसऱ्या डावात 352 धावा झाल्या. जॅक क्रॉली (85) आणि कर्णधार बेन स्टोक्स (83) यांनी अर्धशतके झळकावली, मात्र त्यांचा संघर्ष अपुरा ठरला. अखेर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत अ‍ॅशेसवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

Comments are closed.