मेलबर्नवर 20 फलंदाजांची विकेट, बॉक्सिंग डे कसोटीत गोलंदाजांचा कहर

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अर्थातच एमसीजीवर बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी कहर करत 20 फलंदाजांची विकेट काढण्याचा पराक्रम केला. एमसीजीच्या खेळपट्टीवर केवळ चार मिलीमीटर जास्त गवत होतं, पण त्याने खेळाचं अख्खं गणित बदलून टाकलं. 94,199 प्रेक्षकांच्या डोळय़ांसमोर बॅटला धडधडण्याची संधीच लाभली नाही, इथे फक्त चेंडू गोळीसारखे फलंदाजांवर बरसले आणि ऑस्ट्रेलियाचा 152 धावांत, तर इंग्लंडचा 110 धावांत खेळ खल्लास केला. दोन्ही संघांचे डाव उद्ध्वस्त झाले असले तरी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 4 धावा करत आपली आघाडी 46 धावांवर नेली.

चौथ्या कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांचा उत्सव ठरला. पराभवाने खचलेल्या बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजी दिली आणि इंग्लिश वेगवान गोलंदाजांनी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियी टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. 51 धावांत 4 विकेट ही अवस्था मेलबर्नवर पाहवत नव्हती. लाखाच्या घरात प्रेक्षक असूनही एमसीजीवर वारंवार शांतता पसरत होती.
दुसऱ्या सत्रात ख्वाजा आणि पॅरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो फार काळ टिकला नाही. अॅटकिन्सनच्या अचूकतेने आणि स्टोक्सच्या प्लॅनिंगने पॅरी लेग स्लिपला अडकला. पुढे मायकेल नेसरला दोन वेळा नशिबाची साथ मिळाली आणि त्याने ती संधी दोन्ही हातांनी झेलत जॉश टंगच्या षटकात चार चौकार खेचले. नेसरच्या 35 धावांमुळे ऑस्ट्रेलिया 152 पर्यंत पोहोचली. खरी कमाल टंगने दाखवली. त्याने 45 धावांत अर्धा संघ गारद केला आणि गेल्या 25 वर्षांत एमसीजीवर पाच विकेट घेणारा पहिला इंग्लिशमन होण्याचा मान मिळवला.

stark-neserchi आश्चर्यकारक

ऑस्ट्रेलिया 152 धावांत संपवल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज काही भन्नाट करतील, अशी अपेक्षा होती. पण एमसीजीवर त्यांचीही तारांबळ उडाली. मिचेल स्टार्कने बेन डकेटची विकेट काढत सनसनाटी सुरुवात केली आणि एमसीजीवर उत्साह निर्माण केला. फलंदाजीनंतर मायकल नेसरने गोलंदाजीतही दमदार मारा केला. त्याने जेकब बेथेल (1) आणि जो रुट (0) यांचा अडसर दूर करत इंग्लंडची 4 बाद 16 अशी दुर्दशा केली. पुढे हॅरी ब्रुक आणि बेन स्टोक्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी 50 धावांचीच भर घालू शकली. मग बोलॅण्डच्या इनस्विंगरने ब्रूकला पायचीत केले आणि मधल्या फळीचा चुराडा करत इंग्लंडचा डाव 110 धावांत संपवला. नशीब गस अॅटकिन्सनच्या 28 धावांनी शंभरी गाठून दिली. दिवसभरात 262 धावांत 20 फलंदाजांची विकेट काढण्यात आली. स्टार्कने 2 तर नेसरने 4 विकेट टिपल्या. बोलॅण्डनेही 30 धावांत 3 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 42 धावांची आघाडी मिळवून दिली. दिवसअखेरचा क्षण मात्र सिनेमॅटिक ठरला. ट्रव्हिस हेडसोबत स्कॉट बोलॅण्ड ओपनिंगला आला आणि एक ओव्हर सुरक्षित खेळला. दिवसभराचा गोंधळ, थरार आणि विकेट्सनंतर एमसीजीवरच्या चाहत्यांनी टाळय़ांचा पाऊस पाडला. दुसरा दिवसही असाच थरारक राहिला तर बॉक्सिंग डे कसोटीचीही विकेट दुसऱ्याच दिवशी पडेल.

तीन वाजून पन्नास मिनिटे अन् मेलबर्न थांबला!

एमसीजीवर अॅशेसच्या चौथ्या कसोटीचा पहिला दिवस थराराने भरलेला होता. पहिल्याच दिवशी तब्बल वीस विकेट पडल्या, दोन्ही संघांच्या पहिल्या डावांचा निकाल लागला. पण या बॉक्सिंग डे कसोटीतील खरी जादू स्कोअरकार्डवर नव्हे, तर वेळेच्या त्या एका क्षणात दडलेली होती. ज्याने मैदान, प्रेक्षक आणि क्रिकेटविश्व सगळय़ांनाच हळवे करून टाकले.
स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी अक्षरशः मेलबर्न थांबला. तो क्षण होता ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्याचा. एमसीजी हेच वॉर्नचं घरचं मैदान. सीमारेषेवर रिकी पॉण्टिंग आणि मायकेल वॉन आले. नव्वद हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने वॉर्नच्याच शैलीत टोपी उतरवली गेली. वॉर्नचा मुलगा जॅक्सन आणि मुलगी ब्रूकही तिथेच होती आणि मग सर्वांची टोपी फिरली. विकेट घेतल्यावर वॉर्न जसा प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारायचा, त्याच शैलीत आपल्या आवडत्या वॉर्नला सर्वांनी आदरांजली वाहली. क्षणभर अवघं एमसीजी श्वास रोखून उभं राहिलं.

Comments are closed.