AUS vs ENG: सलग 3 पराभवानंतर अॅशेसमध्ये इंग्लंडचे खाते उघडले; मेलबर्नमध्ये कांगारुंचा दारुण पराभव
इंग्लंड क्रिकेट संघाने अखेर यंदाच्या अॅशेस मालिकेत आपले खाते उघडले आहे. शनिवारी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु ते 32.2 षटकात सहा विकेट्सने साध्य केले. या विजयानंतरही, ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. सध्याच्या अॅशेस मालिकेत कसोटी सामना फक्त दोन दिवसांत संपण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, पर्थमध्ये खेळलेला पहिला सामना फक्त दोन दिवसांत संपला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आठ विकेट्सने विजय मिळवला होता.
175 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. बेन डकेट 26 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर मैदानात उतरलेला ब्रायडन कार्स फार काळ टिकू शकला नाही. त्याने 8 चेंडूत 6 धावा केल्या. सलामीवीर जॅक क्रॉलीने 48 चेंडूत 37 धावांची उपयुक्त खेळी केली, मात्र तो बोलँडच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू बाद झाला.
जेकब बेथेलने मधल्या फळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत 46 चेंडूत 40 धावांची संयमी खेळी केली. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट रिचर्डसनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू बाद झाला. रूटने 38 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. कर्णधार बेन स्टोक्सकडून मात्र अपेक्षित कामगिरी झाली नाही. तो अवघ्या 9 चेंडूत 2 धावा करून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात 34.3 षटकांत सर्व बाद 132 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का 22 धावांवर स्कॉट बोलँडच्या रूपाने बसला. बोलँडने 17 चेंडूत 6 धावा केल्या. जॅक केवळ 5 धावांवर बाद झाला. मार्नस लाबुशेनने 18 चेंडूत 8 धावांचे योगदान दिले. ट्रॅव्हिस हेडने एकाकी झुंज देत 67 चेंडूत 46 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश होता आणि तो ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
Comments are closed.