आश्चर्यच! कांगारू तब्बल 12 वर्षांनी ‘या’ देशाविरुद्ध वनडे मालिका खेळणार
आगामी वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल रोजी एका महत्त्वाच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. यानुसार, ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबर 2026 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. विशेष म्हणजे, 2014 नंतर म्हणजेच तब्बल 12 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ झिम्बाब्वेमध्ये वनडे मालिका खेळणार आहे. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवर होतील. आगामी विश्वचषक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये आयोजित केला जाणार असल्याने, तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कांगारू संघासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे, कारण यावर्षी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया असे दोन दिग्गज संघ त्यांच्या देशात खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील आतापर्यंतच्या 33 सामन्यांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले असून त्यांनी 29 सामने जिंकले आहेत. या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असणार आहे. जूनमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचा मर्यादित षटकांचा दौरा, ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानात कसोटी मालिका आणि झिम्बाब्वे दौरा संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.
Comments are closed.