ऑस्ट्रेलियन जोशसमोर हिंदुस्थान बेहोश, एमसीजीवर टीम इंडियाचा दारुण पराभव

मेलबर्नवर 82 हजारांहून अधिक हिंदुस्थानी चाहत्यांची गर्दी, ‘भारत माता की जय’चे नारे आणि प्रत्येक चौकारावर उडणारे झेंडे… पण या साऱ्या उत्साहावर ऑस्ट्रेलियन जोशने बर्फाचे असे पाणी ओतले की सारी टीम इंडियाच गारठली. ऑस्ट्रेलियन संघात हा जोश जॉश हेझलवूडच्या भेदक गोलंदाजीने भरला आणि संघाला 40 चेंडूआधीच मोठा विजय मिळवून दिला. हा हिंदुस्थानचा टी-20 क्रिकेटमधील दारुण पराभव ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या या उंच, स्थिर आणि निर्दयी वेगवान गोलंदाज हेझलवूडने केवळ चार षटकांत 13 धावा देत तीन विकेट घेतले आणि हिंदुस्थानचा डाव 125 वर गुंडाळला. अभिषेक शर्माने 37 चेंडूंत 68 धावांची झंझावाती खेळी करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला, हिंदुस्थानचे 126 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः तुडवले. मिचेल मार्श आणि ट्रव्हिस हेडने झंझावाती सलामी देत हिंदुस्थानचा पराभव निश्चित केला.

हेझलवूडने पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला पायचीत केले, पण डीआरएसने गिलला तात्पुरता दिलासा दिला. दुसऱ्या चेंडूवर चेंडूने बाहेर झेप घेतली आणि तिसरा चेंडू गिलच्या हेल्मेटवर धडकला! संपूर्ण मैदान क्षणभर शांत. नुकत्याच झालेल्या बेन ऑस्टिन श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर तो क्षण हृदय थरथरवणारा होता. गिल वाचला, पण हेझलवूडसमोर तो झगडत राहिला. दहा चेंडूंत फक्त पाच धावा काढून शेवटी त्याचा फलंदाजी प्रवास ‘मिड ऑफ’वर संपला. संजू सॅमसनला एलिसने पायचीतात पकडलं. सूर्यपुमार यादव हेझलवूडचा बळी ठरला. मग तिलक वर्माने प्रयत्न केला, पण हेझलवूडच्या उंच उडणाऱ्या चेंडूने त्यालाही आकाशात झुलवलं आणि इंग्लिसने पुन्हा पकडलं. तीन चेंडूंत हेझलवूड आणि इंग्लिसने दोन धक्के देत ंिंहंदुस्थानला हादरवले. ज्यात धक्क्यातून आपला संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. धावफलक होता 6 षटकांत 4 बाद 40.

अभिषेकची एकाकी झुंज

बाकी सर्व फलंदाज हेझलवूडच्या पंख्यात उडत असताना अभिषेक शर्मा जणू वेगळय़ाच ग्रहावर फलंदाजी करत होता. बार्टलेटच्या दुसऱ्या षटकात त्याने 14 धावा काढल्या. एलिसच्या धिम्या बाऊन्सरला ओळखून मारलेला ‘अप्पर कट’ ही भन्नाट होता. अभिषेक सुस्साट होता, पण बाकी सारे ढुस्स झाल्यामुळे हिंदुस्थानी संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत. हर्षित राणाच्या 35 धावांच्या खेळीमुळे संघाला धावांची शंभरी गाठता आली. अन्यथा हिंदुस्थानची दयनीय अवस्था पुणालाही पाहता आली नाही. एकीकडे हिंदुस्थानी फलंदाज धारातीर्थी पडत असताना धावा फक्त अभिषेकच्या बॅटमधून निघाल्या. शेवटच्या 66 चेंडूंत तो फक्त 19 चेंडू खेळला आणि त्यातल्या आठ चेंडूंना त्याने सीमेवरून आणि सीमेपलीकडे फेकले. अखेर त्याचा संघर्ष 19 व्या षटकात संपला. त्याने 37 चेंडूंत 68 ठोकल्या तर उर्वरित 10 फलंदाजांनी मिळून 73 चेंडूंत 57 धावा काढल्या.

Comments are closed.