ज्याच्यामुळे 2003 च्या फायनलमध्ये भारताचं स्वप्न भंगलं, तोच दिग्गज खेळाडू मरणाच्या दारात
ऑस्ट्रेलियन ग्रेट डॅमियन मार्टिन कोमात: ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू डेमियन मार्टिन (Damien Martyn) यांच्याबाबत क्रिकेट विश्वातून अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. 54 वर्षीय मार्टिन यांना मेनिन्जायटिस या गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्यांना इंड्यूस्ड कोमामध्ये ठेवले आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
डेमियन मार्टिन यांची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक तब्येत बिघडल्यानंतर डेमियन मार्टिन यांना ब्रिस्बेनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्यांना मेनिन्जायटिस असल्याचे निष्पन्न झाले. हा आजार मेंदू आणि मणक्याच्या मज्जासंस्थेशी संबंधित असून अत्यंत गंभीर मानला जातो. संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराला विश्रांती मिळावी यासाठी डॉक्टरांनी त्यांना कोमामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबीयांचा अधिकृत निवेदन
मार्टिन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. या कठीण काळात जगभरातून मिळणाऱ्या पाठिंब्यासाठी कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत.
अॅडम गिलक्रिस्टसह क्रिकेटविश्वाची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्ट यांनीही मार्टिन यांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितले की, “डेमियन मार्टिन हे मोठे व्यक्तिमत्त्व आहेत आणि ही लढाई जिंकण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे.” याशिवाय अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
डेमियन मार्टिन यांची गौरवशाली कारकिर्द
डेमियन मार्टिन यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक मानले जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 67 कसोटी आणि 208 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सरासरी 46 पेक्षा अधिक होती. विशेष म्हणजे, 2003 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्यांनी खेळलेली नाबाद 88 धावांची ऐतिहासिक खेळी आजही क्रिकेटच्या सुवर्णपानांत नोंदलेली आहे.
अचानक निवृत्तीने सर्वांना धक्का
मार्टिन यांनी 2006 मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना चकित केले होते. त्यानंतर ते बराच काळ प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले. आता त्यांच्या तब्येतीबाबत आलेल्या या बातमीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात चिंतेचे वातावरण आहे.
भारतामध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या 2004 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील शेवटच्या कसोटी मालिकेचा मार्टिन हे महत्त्वाचा भाग होते. त्या मालिकेत शानदार कामगिरी केल्याबद्दल त्यांना ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्या दौऱ्यातील 8 डावांपैकी 4 वेळा त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यांचा कसोटीतील सर्वोच्च स्कोअर 165 धावा असून, तो त्यांनी 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केला होता.
वनडे आणि वर्ल्ड कपमधील योगदान
डार्विन येथे जन्मलेल्या मार्टिन यांनी केवळ 21 व्या वर्षी (1992-93) वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यांची निवड दिग्गज डीन जोन्स यांच्या जागी करण्यात आली होती. त्यांच्या प्रतिभेचा अंदाज यावरूनच येतो की, अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद देण्यात आले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 46.37 च्या सरासरीने धावा केल्या, तर 208 एकदिवसीय सामन्यांत त्यांची सरासरी 40.8 होती. 2000 च्या दशकातील त्या अजिंक्य ऑस्ट्रेलियन संघाचा ते एक अविभाज्य भाग होते, ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्वावर वर्चस्व गाजवले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.