पर्थमध्ये बिअर्डमनचा कहर; पदार्पणातच विकेटचा षटकार टिपत इंग्लंडला लोळवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑस्ट्रेलियाचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज महली बिअर्डमनने पदार्पणातच विकेटचा षटकार टिपत इंग्लंडला अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. त्याच्या भेदक माऱयापुढे इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या 131 धावांत आटोपला. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.

पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर बिअर्डमनने सुरुवातीपासूनच इंग्लिश फलंदाजांवर हल्ला चढवला. अचूक टप्पा, वेग आणि उसळती गोलंदाजी यांच्या जोरावर त्याने इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने अवघ्या 24 धावांत सहा विकेट्स मिळवत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. पदार्पणाच्या सामन्यातच अशी वर्चस्वपूर्ण कामगिरी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले.

इंग्लंडकडून जो रूट, हॅरी ब्रूक यांसारख्या अनुभवी फलंदाजांनाही मोठी खेळी करता आली नाही. एकेक फलंदाज माघारी परतत असताना इंग्लंडचा डाव सावरण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्सननेही तीन विकेट्स मिळवत इंग्लंडची उरलीसुरली आशा संपवली. त्यानंतर इंग्लंडचे 132 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने अवघ्या 23.3 षटकांत तीन विकेट्स गमावून पार केले. कर्णधार मिचेल मार्शने (50)आक्रमक फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

जगातला पाचका गोलंदाज ठरला

वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात सर्वोत्तम 7 विकेट टिपण्याचा विश्वविक्रम स्कॉटलंडच्या चार्ली कॅसलच्या नावावर आहे. त्याने 2024 मध्ये ओमानविरुद्ध पदार्पणातच 21 धावांत सात विकेट टिपले होते. या विक्रमी यादीत आता ऑस्ट्रेलियाच्या महली बिअर्डमनचीही भर पडली आहे. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात त्याने 24 धावांत सहा विकेट्स घेत ऑस्ट्रेलियासाठी पदार्पणातील सर्वोत्तम गोलंदाजी केली. आता तो कॅसलनंतर रबाडा, फिडेल एडवर्ड्स आणि लायल रॉबर्ट्सन या सहा विकेट टिपणाऱया पदार्पणवीरांच्या पंक्तीत सामावला आहे.

Comments are closed.