पर्थ कसोटीत हिंदुस्थानची घसरगुंडी; दुसरा दिवस संपुष्टात, सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
हिंदुस्थानी महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असून या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील एकमेव कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून टीम इंडिया पराभवाच्या छायेत गेल्याच चित्र आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 198 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 323 धावा करत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एलिस पेरी आणि सदरलँड यांनी 128 धावांची दमदार भागिदारी करत संघाची धावसंख्या 300 पार नेली. एलिस पेरीने 76 धावा केल्या आणि सरलँडने 129 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 323 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दोन षटकांमध्ये टीम इंडियाची सलामीची जोडी बाद झाली. त्यानंतर पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारी जेमिमा अवघ्या 14 धावांवर बाद झाली. त्यानंतर एकामागेएक विकेट पडत गेल्या. प्रतिका रावल एकटीने खिंड लढवत संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे. तिने 84 चेंडूंचा सामना 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या आहेत. परंतू तिला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाने दिवसाअखेर 6 विकेट गमावत 105 धावा केल्या आहेत.
टीम इंडिया अजूनही 20 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला एक डाव राखून विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला 20 धावांच्या आत रोखावं लागणार आहे. दुसऱ्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलियाच्या लुसी हॅमिल्टनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शतकवीर सदरलँडने 2 आणि ब्राउनने एक विकेट घेतली आहे.
Comments are closed.