कोहलीवर मानसिक दबाव टाकण्याचा ऑस्ट्रेलियाचा डाव

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येक मालिका म्हणजे केवळ क्रिकेटचा नाही तर मानसिक युद्धाचा संग्राम असतो. सामन्याआधीच ऑस्ट्रेलियन खेळाडू नेहमीप्रमाणे वक्तव्यांचा वर्षाव करून विरोधी खेळाडूंवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्याच जुन्या रणनितीचा वापर करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू शॉर्ट याने विराट कोहलीच्या फलंदाजीतील कमकुवत बाजूवर भाष्य करत एक नवीन वाद पेटवला आहे.
शॉर्ट याने पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, ‘मी आमच्या वेगवान गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये नव्हतो, पण असं दिसतं की कोहली अलीकडे ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूंवर वारंवार बाद होत आहे. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी त्याच्याविरुद्ध बरीच गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्यांना कोहलीला त्रास देण्याची योग्य पद्धत माहीत आहे.’ ऑस्ट्रेलियन संघाने ही मानसिक खेळी मुद्दाम रचल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला होता आणि आता अॅडलेडमध्ये तोच मुद्दा उचलून कोहलीवर मानसिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पर्थमधील सामन्यात 42 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी हिंदुस्थानी खेळाडूंच्या पुनरागमनाचे स्वागत केले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांनी दीर्घ विश्रांतीनंतर परत मैदान गाजवण्याची तयारी दाखवली, पण पहिल्या सामन्यात दोघांनाही लय मिळू शकली नाही. रोहित आठ धावांवर, तर कोहली शून्यावर बाद झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाने कार्यवाहक कर्णधार मिचेल मार्श याच्या नाबाद 46 धावांच्या खेळीच्या बळावर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका 1–0 अशी आपल्या नावावर घेतली.
आता गुरुवारी अॅडलेडमध्ये होणारा दुसरा सामना हिंदुस्थानसाठी निर्णायक ठरणार आहे. मालिका टिकवण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज बेन ड्वारशुईस पिंडरीच्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला असून तो 29 ऑक्टोबरपासून पॅनबेरा येथे सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा आहे.
शॉर्ट पुढे म्हणाला की, ‘माझ्या बॅटिंग ऑर्डरबाबत मी लवचिक आहे. संघासाठी जेव्हा, जिथे खेळायचं असेल तिथे खेळेन. गेल्या काही महिन्यांत फॉर्म चांगला नाही, पण लवकरच रन नक्की.’ मात्र त्याच्या या विधानांच्या आड लपलेली ऑस्ट्रेलियाची मानसिक खेळी सर्वांनाच दिसते आहे. सामना सुरू होण्याआधीच विराट कोहलीच्या ऑफस्टंपचा उल्लेख करून दबाव निर्माण करण्याची ही जुनी ऑस्ट्रेलियन रणनिती आता पुन्हा रंगात आली आहे.
Comments are closed.