दोन वेळचा वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलियन फलंदाज कोमात; रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय

ॲशेस मालिका 2025-26 सुरू असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज डेमियन मार्टिनची प्रकृती अचानक खालावली असून त्याला गंभीर अवस्थेत क्वीन्सलँडमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 54 वर्षीय मार्टिनवर सध्या मेंदूशी संबंधित गंभीर आजार ‘मेनिन्जायटिस’वर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला इंड्यूस्ड कोमामध्ये ठेवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉक्सिंग डेच्या दिवशी मार्टिनची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेनिन्जायटिसमध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या झिल्लींमध्ये सूज येते, जो अत्यंत धोकादायक आजार मानला जातो. डॉक्टर त्याच्यावर सतत लक्ष ठेवून असून प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

मार्टिनच्या प्रकृतीची बातमी समोर येताच संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याच्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू डॅरेन लेहमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले, “डेमियन मार्टिनला भरपूर प्रेम आणि प्रार्थना. मजबूत राहा आणि लढत राहा, लिजेंड. त्यांच्या कुटुंबासाठीही खूप प्रेम.”

मार्टिनचा जवळचा मित्र आणि माजी यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलक्रिस्टने न्यूज कॉर्पशी बोलताना सांगितले की, मार्टिनला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळत आहेत. त्याची पार्टनर अमांडा आणि कुटुंबीयांना जगभरातून मिळणाऱ्या प्रार्थना आणि शुभेच्छांची पूर्ण जाणीव आहे.

क्रिकेटच्या प्रत्येक ब्रेकिंग अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन व्हा..
https://chat.whatsapp.com/LEwPKes7Mwv4e1L4Cyvhxh

डेमियन मार्टिन हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अत्यंत विश्वासार्ह फलंदाज मानला जात होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 67 कसोटी सामने खेळले. 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या मार्टिनला 1994 मध्ये संघाबाहेर करण्यात आले होते. मात्र, सहा वर्षांनंतर 2000 मध्ये त्याने दमदार पुनरागमन करत स्टीव्ह वॉच्या बलाढ्य संघात महत्त्वाची भूमिका बजावली. 2006 च्या ॲशेस मालिकेनंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कसोटी कारकिर्दीत त्याने 4406 धावा केल्या, त्यात 13 शतकांचा समावेश असून त्याची सरासरी 46.37 होती.

वनडे क्रिकेटमध्येही मार्टिनचे योगदान उल्लेखनीय राहिले. 1999 आणि 2003 असे सलग दोन विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो भाग होता. 2003 च्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्याने नाबाद 88 धावांची खेळी करत रिकी पॉन्टिंगसोबत 234 धावांची भागीदारी रचली होती. वनडे कारकिर्दीत त्याने 40.80 च्या सरासरीने 5346 धावा केल्या.

निवृत्तीनंतर काही काळ समालोचन क्षेत्रात काम केल्यानंतर मार्टिन सार्वजनिक जीवनापासून दूर होता. मात्र, नुकतेच ख्रिसमस ईव्हला त्याने बॉक्सिंग डे कसोटीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सध्या संपूर्ण क्रिकेटविश्व त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे.

Comments are closed.