कांगारूंचा धक्कादायक पराभव!ऑस्ट्रेलियन दिग्गजांचा संताप, सिलेक्टर्स आणि खेळाडूंची लावली क्लास

टी-२० विश्वचषकाची सुरुवात होण्यापूर्वी या वेळी ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. संघाने स्पर्धेची सुरुवातही आयर्लंडचा पराभव करून केली होती, मात्र त्यानंतरच्या पुढच्या २ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ज्या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, तो सामना पावसामुळे धुवून निघाला आणि ऑस्ट्रेलियाच्या जागी झिम्बाब्वेने ‘सुपर ८’ मध्ये आपले स्थान निश्चित केले. संघातील अनेक खेळाडू दुखापतींशी झुंजत होते, ज्यामुळे संघाचे योग्य संयोजन (Combination) जमू शकले नाही. ऑस्ट्रेलियाच्या या पराभवावर एका दिग्गज खेळाडूने आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनी आपली भडास काढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर बोलताना ते म्हणाले, “आम्ही या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच म्हटले होते की, आम्हाला ऑस्ट्रेलियन संघाबद्दल चिंता वाटत आहे. अचानक ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण दबदबा संपल्यासारखा वाटत आहे, पण यात काही आश्चर्यकारक नाही. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड दुखापतग्रस्त आहेत, तर मिचेल स्टार्कने टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे.” याचसोबत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या निवड प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्यवस्थापनाने स्टीव्ह स्मिथला सुरुवातीला संघात स्थान दिले नाही आणि नंतर त्याला श्रीलंका येथे बोलावले, मात्र शेवटच्या क्षणी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. संघ ‘सुपर ८’ च्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे, मात्र विश्वचषकात ओमानविरुद्धचा त्यांचा एक सामना अद्याप बाकी आहे. संघ २० फेब्रुवारीला या सामन्यासाठी मैदानात उतरेल. २०२१ मध्ये संघाने विजेतेपद पटकावले होते. गुणतालिकेवर नजर टाकली तर, झिम्बाब्वेच्या खात्यात आता ५ गुण झाले असून त्यांनी ‘सुपर ८’ साठी पात्र ठरले आहे.
Comments are closed.