सबालेंकाची फायनल हॅटट्रिक, जेतेपदाच्या लढतीत मॅडिसन किजचे आव्हान
गतविजेत्या एरिना सबालेंकाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली असून जेतेपदाच्या हॅटट्रिकपासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. आता जेतेपदाच्या लढतीत शनिवारी तिच्यापुढे अमेरिकेच्या मॅडिसन किजचे आव्हान असेल.
बेलारूसच्या सबालेंकाने गुरुवारी झालेल्या उपांत्य लढतीत स्पेनच्या पाउला बडोसा हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. एरिना सबालेंकाचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील हा सलग 20 वा विजय ठरला. तिने 2023 व 2024 अशा सलग दोनदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविलेले आहे. चुरशीच्या दुसऱया उपांत्य लढतीत 19 व्या मानांकित मॅडिसन किजने द्वितीय मानांकित पोलंडचा इगा स्विटेकचा 5-7, 6-1, 7-6(10/8) असा पराभव करीत फायनलमध्ये धडक दिली.
पुरुषांच्या उपांत्य लढती आज
ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुषांच्या उपांत्य लढती आज रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत सर्बियाचा नोवाक जोकोविच व जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आमनेसामने असतील. दुसऱया उपांत्य लढतीत अव्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरपुढे अमेरिकेच्या बेन शेल्टनचे आव्हान असेल.
Comments are closed.