12 वर्षांचा दुष्काळ संपणार! वर्ल्ड कपच्या तयारीसाठी गतविजेता संघ 'या' देशात भिडणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी लक्षात घेऊन 2 एप्रिल रोजी एक मोठी घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियन संघ या वर्षी सप्टेंबर महिन्यात झिम्बाब्वेचा (AUS vs ZIM) दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दौऱ्यात कांगारू संघ यजमानांविरुद्ध 15 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपचे आयोजन दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे यांच्या संयुक्त यजमानपदाखाली केले जाणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही वनडे मालिका मेगा इव्हेंटच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
झिम्बाब्वेला या वर्षी आता भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचेही यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या क्रिकेट बोर्डाला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मोठी मदत होईल. ऑस्ट्रेलियन संघाने शेवटचा झिम्बाब्वे दौरा 2018 मध्ये केला होता, जेव्हा त्यांनी तिथे टी-20 ट्राय सिरीज खेळली होती, ज्यामध्ये तिसरा संघ पाकिस्तानचा होता. तर त्यांनी झिम्बाब्वेमध्ये शेवटचा वनडे सामना 2014 मध्ये खेळला होता, त्यानंतर आता ते या देशात 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वनडे सामना खेळतील. या वनडे मालिकेतील पहिला सामना 15 सप्टेंबरला होईल, तर दुसरा सामना 18 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 20 सप्टेंबरला खेळवला जाईल. या वनडे मालिकेतील तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील.
ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेविरुद्धचा वनडे रेकॉर्ड पाहिला तर तो आतापर्यंत एकतर्फी राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले गेले आहेत आणि यापैकी ऑस्ट्रेलियन संघ 29 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, तर झिम्बाब्वेला केवळ तीन सामन्यांत विजय मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या आणखी एका दौऱ्याची घोषणा झाल्यामुळे आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत त्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त राहणार आहे. यामध्ये कांगारू संघाला जून महिन्यात मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेशचा दौरा करायचा आहे, तर त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ते आपल्या मायदेशात बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. यानंतर त्यांना झिम्बाब्वेचा दौरा करायचा आहे. तसेच ही वनडे मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होईल.
Comments are closed.