भारतावर ऑस्ट्रेलियाचा अरुंद विजय
युरोप टप्प्यात भारताचा सलग सहावा पराभव
वृत्तसंस्था/ अँटवर्प, बेल्जियम
एफयाएच प्रो लीग हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्प्यातील भारताच्या पुरुष हॉकी संघाची पराभवाची मालिका पुढे सुरू राहिली आहे. रविवारी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या परतीच्या सामन्यातही भारताला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या टप्प्यातील भारताचा हा सलग सहावा पराभव आहे.
भारताला याआधी नेदरलँड्स, अर्जेन्टिना यांच्याविरुद्धचे अटीतटीचे सामने गमविले आहेत. भारताचा माजी कर्णधार मनप्रीत सिंगचा हा 400 वा सामना होता. भारताला आघाडी मिळाली असली तरी तो संघाला प्रेरित करू शकला नाही. संजय (तिसरे मिनिट), दिलप्रीत सिंग (36) यांनी भारताचे गोल केले तर टिम ब्रँड (चौथे मिनिट), ब्लेक गोव्हर्स (पाचवे मिनिट), कूपर बर्न्स (18 वे मिनिट) यांनी ऑस्ट्रेलियाचे गोल नोंदवले. भारताने या सामन्याची सकारात्मक सुरुवात करीत सुरुवातीच्या झटापटीत सरस ठरला. तिसऱ्याच मिनिटाला संजयने भारताला आघाडीवर नेले. पहिल्या पेनल्टी कॉर्नर घेताना रिबाऊंड झालेल्या चेंडूवर त्याने हा गोल नोंदवला. पण भारताचा हा आनंद अल्पजीवी ठरला. पुढच्याच मिनिटाला टिम ब्रँडने गोलरक्षक कृशन बहादुर पाठकला हुलकावणी देत गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. आणखी एका मिनिटानंतर ब्लेक गोव्हर्सने सर्कलजवळून जोरदार फटका मारत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. यावेळीही पाठकला गोल रोखता आला नाही.
यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविले आणि चार पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यातील चौथ्यावर कूपर बर्न्सने अचूक गोल नोंदवला. 24 व्या मिनिटाला अप्रतिम गोलरक्षण करीत पाठकने डेव्हिस अॅटकिनचा प्रयत्न फोल ठरविला. ऑस्ट्रेलियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण पाठकने यावेळीही तो फोल ठरवला. 27 व्या मिनिटाला भारताने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही.
मध्यंतरानंतर मात्र भारताने मुसंडी मारली आणि 36 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने शिलानंद लाक्रा व अभिषेक यांनी मिळवून दिलेल्या संधीवर गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाची आघाडी 2-3 अशी कमी केली. मात्र ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व पुन्हा पुढे सुरू ठेवले. भारतीय बचावफळीवर प्रचंड दबाव आणत त्यांनी शेवटच्या दहा मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण पाठकने शानदार गोलरक्षण करीत त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरविले. भारताचा पुढील सामना बेल्जियमविरुद्ध 21 जून रोजी याच ठिकाणी होणार आहे.
Comments are closed.