ऑस्ट्रेलियाने केली पाकिस्तानची फजिती! पाठवला नवखा संघ, सर्व अनुभवी खेळाडूंना ब्रेक

फेब्रुवारी महिन्यात पुरूषांचा टी२० विश्वचषक २०२६ सुरू होत आहे. यामुळे सर्व संघ टी२० सामन्यांचा सराव व्हावा म्हणून अधिकाधिक मालिका खेळत आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातही तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यातील या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. १७ सदस्य असलेल्या या ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये त्यांनी अनेक अनुभवी खेळाडूंना आराम दिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघातून या टी२० मालिकेसाठी पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, जोश हेजलवूड, टीम डेविड आणि नॅथन एलिस यांना वगळले आहे. यामधील कमिन्स, हेजलवूड आणि डेविड हे दुखापतीतून सावरत आहेत. तसेच मॅक्सवेल आणि एलिस यांना ब्रेक दिला आहे. त्यांच्याजागी संघात वेगवान गोलंदाज महली बियर्डमन आणि जॅक एडवर्ड्स यांना संधी मिळाली आहे.

बियर्डमन आणि एडवर्ड्स यांनी बिग बॅश लीगमध्ये उत्तम कामगिरी केली होती. जर त्यांना पाकिस्तानविरुद्ध अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले तर त्यांचे ते आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे. तसेच सीन एबॉट, बेन ड्वार्शुइस, मिचेल ओवेन, जोश फिलिप आणि मॅट रेनशॉ यांनाही पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात घेतले आहे. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टी२० विश्वचषक संघाचा भाग नाहीत.

“पाकिस्तानच्या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना अनुभव मिळून त्यांचा सरावही होईल. यामधील बियर्डमन हा नेहमीच संघात राहिला असून एडवर्डस भारताविरुद्धच्या वनडे सामन्यासाठी संघात होता “, असे संघनिवड अधिकारी जॉर्ज बेली म्हणाले.

पाकिस्तान टी२० दौऱ्यातील पहिला सामना २९ जानेवारी, दुसरा सामना ३१ जानेवारी आणि तिसरा सामना १ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने लाहोरमध्ये खेळले जाणार आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमधून थेट श्रीलंकेला टी२० विश्वचषकासाठी रवाना होणार आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडलेला ऑस्ट्रेलियाचा संघ-

जॅक एडवर्ड्स, ट्रेविस हेड, मॅट रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल मार्श (कर्णधार), कुपर कॉनली, कॅमरून ग्रीन, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉईनिस, जोश इंग्लिस (विकेटकीपर), जोश फिलिप (विकेटकीपर), सीन एबॉट, झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, बेन ड्वार्शुइस, मॅथ्यू कुह्नेमन आणि ऍडम झंपा.

Comments are closed.