पाऊलखुणा – दासोपंतांची पासोडी

<< आशुतोष बापट
[email protected]

दासोपंत कुबेर मराठी भाषेचे, अंबाजोगाई क्षेत्र त्यांचे।
कर्ते अपार ग्रंथांचे, परोपकारी खरे।।

महाराष्ट्राला आणि त्यातही मराठवाड्याला संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी आणि कितीतरी मराठवाड्यातले संत या भूमीत होऊन गेले. दासोपंत हे त्यांच्याच पंक्तीत बसणारे. मराठवाड्यातले एक महान संत-कवी. दासोपंत या नावासोबत `पासोडी’ हा शब्द येतोच. बीड जिह्यातले अंबाजोगाई हे दासोपंतांचे गाव. दासोपंतांचा काळ हा इ.स. 1551 ते 1616. दत्तसंप्रदायातले फार थोर आणि अधिकारी व्यक्ती असलेल्या दासोपंतांनी अनेक काव्य रचना केल्या. त्यांना कुठल्याही विषयाचे वावडे नव्हते. अनेक विषयांत त्यांनी केलेल्या विविध रचनांमुळे त्यांना लोकांनी `सर्वज्ञ’ अशी पदवी दिली होती. त्याचबरोबर त्यांना `मराठी भाषेचे कुबेर’, `मराठीतील महर्षी व्यास’ अशी विविध नामाभिधाने प्राप्त झाली होती.

पासोडी हा प्रकार दासोपंतांनी प्रसिद्धीस आणला. पासोडी म्हणजे जाड कापड, आणि त्या कापडावर केलेली काव्यरचना होय. ही काव्य रचना पंचीकरण म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या पासोडीला `पंचीकरण पासोडी’ असे म्हणतात. दासोपंतांची ही पासोडी 40 फूट लांब आणि 4 फूट रुंद आहे. आणि दासोपंतांची ही पासोडी जवळजवळ 400 वर्षे जुनी आहे. अंबाजोगाईमध्ये असलेल्या `थोरल्या देवघर` या त्यांच्या निवासस्थानी आजही ती व्यवस्थित जपून ठेवली आहे. त्याच्यावर काचेचे आवरण घातलेले आहे. या पासोडीवर लेखन तर आहेच, पण त्याचसोबत दासोपंतांनी केलेली सुंदर चित्रकलासुद्धा बघायला मिळते. वेदांताच्या अभ्यासकांना या पासोडीवरील लेखनातून विशेष माहिती प्राप्त होते. पासोडीवरील लिखाण जुन्या मराठी (प्राकृत) भाषेत असून ते जास्त करून काळ्या शाईने लिहिलेले आहे. या लिखाणाच्या मध्ये काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी चित्रे काढलेली दिसतात. मार्कंडेय पुराणात सांगितलेल्या चित्रसूत्राचे तंतोतंत पालन ही पासोडी लिहिताना केलेले आहे. 40 फूट लांबीच्या कापडावर हे सगळे कसे लिहिले असेल हे आश्चर्य नक्कीच आहे. आपल्या लिखाणासाठी कापड हे माध्यम वापरणे हेसुद्धा काहीसे वेगळेच म्हणावे लागेल. पण दासोपंतांनी हे करून दाखवले आहे. कापडावर लिहिण्याचा त्याचा उद्देश हा आपले लिखाण चिरकाल टिकावे हाच असणार. कागद कालांतराने जीर्ण होतो, तो घडीवर फाटू शकतो. कापडाचे तसे होत नाही. कापड घडी करून किंवा गुंडाळून ठेवता येते, म्हणूनच दासोपंतांनी कापडाची निवड केली असावी. या पासोडीवरील काही मजकूर आता अस्पष्ट झालेला असला तरी पासोडी हा प्रकारच मुळी आगळावेगळा आहे.

दासोपंतांच्या या पासोडीची मोहिनी आणि त्याबद्दलचे कुतूहल देशाच्या राष्ट्रपतींनादेखील पडले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 6 ऑक्टोबर 1954 रोजी ही पासोडी प्रत्यक्ष पाहण्यासाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात मागवून घेतली होती. ती पाहिल्यानंतर या पासोडीच्या संवर्धनासाठी राष्ट्रपतींनी या पासोडीसाठी एक विशेष कपाट बनवून दिले. याशिवाय राज्यसभेत डॉ. मौलाना आझाद आणि लोकसभेत अध्यक्ष दादासाहेब मावळंकर यांनीही या पासोडीबद्दल गौरवोद्गार काढलेले असून ते संसदेच्या रेकॉर्डवर आहेत. दासोपंतांनी संस्कृत, हिंदी, मराठी, प्राकृत, कन्नड, तेलगु, फारसी अशा जवळजवळ 10 ते 12 भाषांमध्ये लिखाण केले आहे. इतक्या भाषेत एखाद्या व्यक्तीने क्वचितच लिखाण केले असेल. पासोडी ही त्यांची एक कलाकृती होती, प्रत्यक्षात त्यांनी अशा 100 पेक्षा जास्त साहित्यकृतींची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना मराठी भाषेचे `नवकोट नारायण’ असे म्हणतात. दासोपंत हे निस्सीम दत्तभक्त होते.

दासोपंतांवर सन 1922 साली जर्नल ऑफ अमेरिकन ओरीएंटल सोसायटीच्या 42 व्या खंडात जस्टीन इ. अॅबॉट यांनी विस्तृत लेखन केलेले आहे. तसेच जेन वॉटर यांनी अमेरिकन टाइम्समध्ये दासोपंतांवर लिखाण केले आहे. दासोपंतांचे वंशज आजही अंबाजोगाईमध्ये देवघर या त्यांच्या पारंपरिक घरात राहतात. ते आवर्जून आपल्याला दासोपंतांची पासोडी तसेच त्यांचे देवघर, त्यांच्या पूजेतील मूर्ती दाखवतात. दासोपंतांच्या देवघरात एकमुखी दत्ताची मूर्ती आहे. त्यांचे एक वंशज श्री दत्तप्रसाद गोस्वामी हे अंबाजोगाईच्या महाविद्यालयात प्राध्यापक असून इतिहासात विशेष रुची असणारे व्यक्तिमत्त्व आहे. अंबाजोगाई येथील देवी योगेश्वरी ही अनेक चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता. तिच्या दर्शनाला ही मंडळी नित्यनेमाने जात असतात. या मंडळींनी आपल्या अंबाजोगाईच्या भेटीत वेळात वेळ काढून दासोपंतांचे देवघर, त्यातील विविध मूर्ती आणि त्यांची पासोडी बघूनच आले पाहिजे. दासोपंतांचे जीवन, त्यांचे साहित्य, त्यांची दत्तभक्ती हा मोठा इतिहास मराठवाड्यातील अंबाजोगाई इथे वसलेला आहे. इतिहासाचा मोठ्ठा ठेवा दासोपंतांच्या वंशजांनी जपलेला आहे त्याचे अवश्य दर्शन घ्यायला हवे.

Comments are closed.