दखल – वास्तवाची झाडाझडती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

<< बाळासाहेब कांबळे

मराठी साहित्यात आपल्या चिंतनशील कविता लेखनाने मोलाची भर घालणारे नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी पी. विठ्ठल यांची ‘संभ्रमाची गोष्ट’ ही नवी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. पी. विठ्ठल यांचा मूळ पिंड कवितेचा असला तरी त्यांनी समीक्षा आणि वैचारिक लेखनातही लक्षणीय योगदान दिले आहे. ‘संभ्रमाची गोष्ट’ या कादंबरीतून त्यांनी माणसाच्या जगण्यातील मोठी गुंतागुंत मांडलेली आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी भटकत चाळिशी पार केलेल्या नंदू पांगरीकरची ही कहाणी संवेदनशील वाचकांना अक्षरक्षः गलबलून टाकते. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जगण्यात माणसासमोर असंख्य प्रश्न उभे आहेत. त्यातला महत्तम प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. अशाच सीएचबीवर काम करणाऱ्या अस्वस्थ तरुणाची, अर्थात एका असहाय्य प्राध्यापकाची ही गोष्ट आहे. नंदू पांगरीकर हे त्याचे नाव. अभावग्रस्त परिस्थिती असूनही संघर्ष करत तो शिक्षण घेतो. त्याच्या शैक्षणिक काळातील कटू अनुभव या कादंबरीत व्यक्त झालेले आहेत.

आजच्या जगण्यातील वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते. शिक्षणाच्या काळात आधारभूत ठरलेल्या आणि नोकरीच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात असलेल्या अनेक व्यक्तिरेखा येथे येतात. त्यांच्या वृत्तीतला फोलपणा लेखक पी. विठ्ठल यांनी अगदी चोखपणे दर्शवला आहे. संस्था चालकांची मनमानी, गुणवत्तेपेक्षा आर्थिक व्यवहाराला महत्त्व, प्राध्यापकांची वृत्ती-प्रवृत्ती या सगळ्या प्रश्नांना ते गांभीर्याने व्यक्त करत बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तमानाला भिडत राहतात. वैयक्तिक हितसंबंधामुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. अशा वेळी गुणवत्ता असूनही दखल घेतली जाण्याची शक्यता खूप धूसर झाली आहे. या वास्तवाचे परखड चित्रण या कादंबरीत येते. तरुण वयात नायकाचे आपल्या मित्र, मैत्रिणीत गुंतत जाणे स्वाभाविक आहे. याचे भावनात्मक चित्रणही या कादंबरीत येते. तसेच भेटलेल्या अनेक व्यक्तींचे भलेबुरे स्वभावदर्शन लेखकाने घडवले आहे.

परिस्थितीचे चटके खात जगणाऱ्या प्रत्येक तरुणाची ही गोष्ट आहे. आपल्या आयुष्याच्या भल्यासाठी शिक्षण घेऊन प्रत्येक सामान्य तरुण धडपडतो आहे. पदवी, शिक्षण, गुणवत्ता असूनदेखील या जगात आपला निभाव लागेल किंवा नाही? या संभ्रमात आजची पिढी जगते आहे. आपल्या नोकरीच्या जीवावर आईवडिलांना चार सुखाचे दिवस दाखवण्याचा आणि मुलाबाळांना मनासारखे जगू देण्याच्या इच्छांना आर्थिक कोंडीमुळे मनातल्या मनात गाडून टाकावे लागते हे आजचे वास्तव या कादंबरीतून निर्देशित होत असले तरी जगण्याची धडपड करणाऱया अशा असंख्य तरुणांची ही कहाणी आहे. आपल्या व्यापक चिंतनशीलतेने लेखकाने असे अनेक मुद्दे बारकाव्याने मांडले आहेत. उच्च शिक्षण घेऊन आणि जवळ गुणवत्ता असूनदेखील आजच्या भयाण काळात तरुणांना निराशा आणणारे वास्तव ‘संभ्रमाची गोष्ट’ समोर आणते. कठोर संघर्षात स्वाभिमानाने उभे राहण्याची हिंमत बाळगणाऱ्या तरुणाची ही कहाणी अनेक बेरोजगार तरुणांचे आणि त्यांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करते. शिक्षण क्षेत्रातील कटू वास्तव अधोरेखित करणारी ही कादंबरी समकालीन राजकारण आणि सांस्कृतिक संघर्षावरही अत्यंत प्रभावीपणे भाष्य करते.

संभ्रमाची गोष्ट
लेखक: पी. विठ्ठल
प्रकाशक: राजहंस पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे ः 260, किंमत ः ३८०/- रु.

Comments are closed.