क्रिकेटनामा – विजयोत्सव ‘रो-को’चाच!

>>
‘…कभी कभी लगता, साला अपूनीच भगवान हैं’, नवाजुद्दीनचा हा उद्गार काल मला बरंच काही समजावून गेला! काल रो-कोने आपल्या उत्साहाने अन् साजरा केलेल्या उत्सवाने ‘अपूनीच भगवान’ असल्याचा समज करून त्यांच्या निवृत्तीचं भाकीत करणाऱ्यांच्या मुस्कटात मारली. माझाही गाल लाल-म्-लाल झालाय! ‘रो’चा झाम्पाला कव्हरवरून मारलेला षटकार आणि ‘को’ने स्टार्कच्या हाताखालून ठोकलेला सरळ ड्राईव्ह पाहिल्यानंतर बोटं तोंडात गेली. ‘रो’चं हे तेहत्तीसावं शतक आणि ‘को’चं पंच्याहत्तरावं अर्धशतक. कालचा त्यांचा नूर निराळाच म्हणावा लागेल. दोघांनाही 2027 च्या विश्वचषकासाठी हार्दिक शुभेच्छा!
आणि त्रिवार अभिनंदन ‘आगौ’चं! हर्षित राणाचा पाठपुरावा केल्याबद्दल. किती टीका केली, नावं ठेवली, वाईट साईट बोललो; पण ‘आगौ’ने आपला आग्रह सोडला नाही. अखेर राणानेही त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्याची दिशा, टप्पा, वेग आणि उसळी परिणामकारक होती. केवळ साडेचार धावांच्या सरासरीने त्याने गोलंदाजी केली आणि चार बळी मिळवले! अर्थात, त्यापैकी एक रोहितच्या नावे कारण त्याने स्वतःला स्लिपमध्ये उभं केलं, राणा नको म्हणत असतानाही. आणि दुसरा बळी श्रेयसचा नावावर, श्रेयसने घेतलेल्या अजब झेलामुळे!
राणाला सिराज, प्रसिद्ध, कुलदीप आणि अक्षरने एकेक बळी घेऊन छान साथ दिली, ऑस्ट्रेलियाला रोखलं. डावाच्या मध्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवण्याची कामगिरी त्यांनी चोख निभावली. अर्थात, बरचसं श्रेय द्यायचं ते हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांना. श्रेयस अय्यरने अॅलेक्स पॅरीचा घेतलेला झेल केवळ अप्रतिम होता. साताठ यार्ड उलटं धावत पुढे सूर मारून त्याने आकाशातून आलेलं देवाचं देणं ओंजळीत झेललं अन् मग उराशी कवटाळलं! नजीकच्या काळात अशी करामत पाहायला मिळाली नव्हती! रोहित, विराट आणि प्रसिधने घेतलेले झेल फार नेत्रदीपक नव्हते, पण महत्त्वाचे मात्र जरूर होते. तेंव्हा राहून राहून वाटलं, क्षेत्ररक्षणाचा हाच दर्जा अॅडलेडला दाखवला असता तर…
कुलदीपला आणि प्रसिधला ‘आगौ’ने संधी दिली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. आठव्या क्रमांकावर फलंदाज खेळण्याच्या हट्टाचं पुनरावलोकन त्यांनी करणं आवश्यकच आहे. भविष्याकडे नजर ठेवून 2027 च्या विश्वचषकासाठी संघ निवडायचा असेल तर ‘आगौ’ला कालच्या सामन्यातून अनेकानेक धडे मिळाले असतील अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाने संघात केलेले प्रयोग पाहून त्यांना स्फूर्ती मिळू शकते. तशीच स्फूर्ती ‘रो-को’ने दाखवलेल्या लढवय्या वृत्तीनेही मिळू शकते!

Comments are closed.