क्रिकेटनामा – कसोटीला प्राधान्य द्या!

>>

‘कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिलं पाहिजे’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 असं हरल्यावर गंभीर गंपू काल म्हणाला. विंडीजविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकल्यावर म्हणाला होता, ‘कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी चांगल्या खेळपट्ट्या बनवा!’ मग कोलकात्यात कशी बनवली खेळपट्टी? गंपू पुढे म्हणाला, ‘संघातल्या बहुतांश खेळाडूंकडे अनुभवाची कमतरता आहे आणि कसोटी सामन्यांचा कार्यक्रम अधिक योग्य पद्धतीने आखणं आवश्यक आहे,’ गंभीरच्या या म्हणण्यात थोडं फार तथ्य आहे. पण हे कुणी कुणाला सांगायचं! आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर मर्यादित षटकांचे आठ सामने कुणी आयोजित केले? मग, गंपू ही गोष्ट तडक बोर्डाला का सांगत नाही? प्रसिद्धीमाध्यमांतर्फे का सांगतो? कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिलं जात नाही हे प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी माहिती नव्हतं का? अन् संघाकडे अनुभव नाही हेसुद्धा त्याला आधी ठाऊक नव्हतं का? अननुभवी खेळाडूंकडून योग्य मानसिक तयारी करून घेण्याची जबाबदारी स्वतःचीच आहे हे गंपू मान्य करतो, पण कृतीत मात्र आणत नाही. काढा-बदला-फेका पद्धतीने खेळाडूंना अनुभव आणि आत्मविश्वास मिळू शकतो? आपण वेळोवेळी काय बोलतो अन् काय कृती करतो याचा ताळमेळ बसावा असं गंभीरला वाटत नाही का!

वर्षभरापूर्वी न्यूझीलंडचा संघ आपली अब्रू तारतार करून गेला त्यापूर्वी श्रीलंकेचा दौरा करून आला होता. तसंच, आपल्या इज्जतीच्या चिंधड्या उडवून गेलेला आफ्रिकेचा संघ पाकिस्तानचा दौरा करून तयारीनिशी आला होता.

कुठल्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर आपल्या अननुभवी खेळाडूंना खेळता येतं हे समजण्याऐवढा अनुभव गौतमकडे नाही का? तुझ्या फलंदाजांना ना कोलकात्याच्या आखाड्यावर खेळता आलं ना गुवाहाटीच्या ठरस्त्यावर! शेवटच्या दिवसाचं म्हणशील तर आपल्या देशात कुठला रस्ता बांधून झाल्यावर पाचव्या दिवशी टिकलाय!

हिंदुस्थानी संघाला दोन्ही कसोटींत शुभमन गिलची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली हे खरं. शुभमन असता तर कदाचित मालिकेचा निर्णयसुद्धा वेगळा लागला असता! पण देशभरात चांगली कामगिरी करणारे अनेकानेक फलंदाज आहेत. त्यांना संधी देण्याची बात आपला गंपू करत नाही अन् त्याचा सहकारी शंभूही करत नाही! दोघंही देशेषु फिरत राहतात. इतर फलंदाज नजरेत यावेत तरी कसे!

नुसती बोलाची कढी अन् बोलाचाच भात!

हिंदुस्थानच्या प्रशिक्षकाप्रमाणेच आफ्रिकेचा प्रशिक्षक शुक्री कॉन्राडचेही कान उपटावेच लागतील. ‘दुसरा डाव घोषित करण्यापूर्वी हिंदुस्थानी संघाला ग्रोव्हेल करायला लावावं’, असं त्याला वाटलं! (वर्णभेदाच्या काळात म्हणजे जेव्हा दक्षिण आफ्रिकेत ‘काळे, गोरे आणि भारतीय’ असा वर्णभेद केला जात होता तेव्हा गोरे लोक इतरांना हातापायात बेड्या घालून जमिनीकडे तोंड करून रेंगत ठेवत, गुलामासारखे वागवत. इंग्रजीमध्ये यालाच ‘ग्रोव्हेल’ करायला लावणं म्हणतात). दक्षिण आफ्रिकेतच जन्मलेला इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेग 1976 मध्ये विंडीजला ‘ग्रोव्हेल’ करायला लावू, असं मालिकेपूर्वी म्हणाला होता. प्रत्यक्षात मात्र क्लाईव्ह लॉईडच्या संघाने इंग्लंडलाच 3-0 अशी धूळ चारली अन् टोनी ग्रेगला त्याच्या अर्वाच्य वक्तव्याबद्दल माफी मागायला लावली होती!

आता आपला संघ तीन वन डे आणि पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकांत दक्षिण आफ्रिकन संघाशी दोन हात करणार आहे. याच दोन मालिकांत आपला संघ शुक्री कॉन्राडला योग्य उत्तर देतो की नाही याकडे माझं लक्ष मोठ्या आतुरतेने लागून राहिलेलं आहे!

Comments are closed.