वेबसीरिज – आशयघन सत्य

<<<तरंग वैद्य>>>

अंधविश्वासाला बळी पडून माणूस आपली माणुसकी विसरून जातो. अशी सत्य घटना घडली परभणीजवळील मानवत येथे. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या या घटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज. परभणी जिह्यातील मानवत या गावात अल्पवयीन मुली आणि महिला असे एकूण सात खून होतात व संपूर्ण यंत्रणा हादरून जाते. स्थानिक पोलीस तपास करतात, पण गुन्हेगारांना पकडण्यात यशस्वी होत नाहीत. प्रकरण गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचतं आणि ते सक्षम पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णींना ताबडतोब मानवतला जाण्याचे आदेश देतात. रमाकांत कुलकर्णी मानवतला येतात. आपल्या अनुभव आणि बुद्धीच्या जोरावर तिथल्या पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन तपासकार्याला गती देतात व शेवटी अर्थातच गुन्हेगारांना जेरबंद करतात ही ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजची थोडक्यात कथा. जी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 4 ऑक्टोबर 2024 पासून रुजू झाली आहे. पोलीस तपासाची ही कथा रमाकांत कुलकर्णी यांच्या ‘फूटप्रिंट्स ऑन द सॅण्ड’ या पुस्तकावर आधारित आहे.

साधारण 35 ते 45 मिनिटांचे आठ भाग सशक्त पटकथेच्या जोरावर आपल्याला खिळवून ठेवतात. इथे लेखक आणि पटकथाकार गिरीश जोशींचे निश्चितच कौतुक करायला हवे. रमाकांत कुलकर्णींना तपासादरम्यान एक गोष्ट समजते की, झालेल्या हत्या कुठल्या वैमनस्यापायी किंवा पैशांसाठी झालेल्या नाहीत. तर सगळा प्रकार अंधविश्वासापायी झालेला आहे आणि यामागे कुठल्या तरी भोंदूबाबाचा हात आहे हे त्यांच्या लक्षात येतं. पहिले चार खून झाल्यावर प्रमुख संशयित एक जोडपं असतं. ज्यांना तिथल्या पोलिसांनी न्यायालयाचा आदेश घेऊन मानवतला येण्यास मनाई केली असते, पण पुढचे खून ते मानवतमध्ये नसताना घडतात आणि पोलीस बुचकळ्यात पडतात. न्यायपालिकाही या जोडप्याच्या बाजूने निकाल देते आणि ते परत आपल्या गावात मानवत येथे पोलिसांची मान झुकवत ताठ मानेने परत येतात.

रमाकांत यांनाही या जोडप्यावरच संशय असतो, पण त्यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसल्यामुळे त्यांचे हात बांधलेले असतात. हे जोडपं म्हणजेच उत्तमराव आणि रुक्मिणी. परभणीला असताना रुक्मिणीची बहीण समिन्द्री त्यांचा दुग्ध व्यवसाय सांभाळत असते. उत्तमराव या व्यवसायाच्या आडून हातभट्टीचा व्यवसायही करतो याचा पोलिसांना संशय असतो. उत्तमराव परभणीत असताना इथे खून होतात. त्यामुळे संशयाचा काटा त्यांच्यावरून दूर होत समिन्द्रीवर येतो.

रमाकांत कुलकर्णी मानवत येथे आल्यावर आधी झालेले खून ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीने दाखवून मग त्यांचा तपास सुरू होतो. ते ज्या प्रकारे प्रेक्षकांना दाखवले आहे, त्यामुळे खूपच प्रभावशाली ठरले आहे. हे हत्याकांड इतके निर्घृण होते की, बघताना अंगावर अक्षरश काटा येतो. हे चित्रीकरण आणि इतर सगळेच चित्रीकरण अशा पद्धतीने केले आहे की, आपण प्रत्यक्ष त्या गावात आहोत असा अनुभव येतो. म्हणूनच छायाचित्रकार प्रशंसेस पात्र आहे.

अभिनयाबद्दल बोलायचं तर या गलबताचा सुकाणू रमाकांत कुलकर्णी म्हणजेच आशुतोष गोवारीकर यांच्या हातात आहे आणि तो योग्य हातात आहे असंच म्हटलं पाहिजे. मकरंद अनासपुरेंची भूमिका खलनायकी असून त्यांनी आपली छाप पाडली आहे. तो चिडला की, कुठल्याही थराला जाऊ शकतो हे त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि डोळ्यांनी दाखवून दिलं आहे. किशोर कदम यांची भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची आहे आणि त्यांनी ती उत्तम निभावली आहे. सई ताम्हणकर गुणी अभिनेत्री आहे. इथे पण तिने छान अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काहीशी घाबरलेली, पण खंबीर अशी तिची भूमिका भाव खाऊन जाते. गावची भाषा पण तिने छान जपली आहे. इतर कलाकारांनीही आम्ही कुठेही कमी नाही हे दाखवून दिलं आहे. आता बोलू या त्या अभिनेत्रीबद्दल जिने या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पोटच्या पोरासाठी आसुसलेली आणि त्यासाठी काहीही करणारी स्त्री तिने ज्या पद्धतीने रंगवली आहे त्याला तोड नाही. रडणं, चिडणं, भडकणं आणि भावुक होणं हे सगळे भाव तिने सहजतेने दाखवले आहेत. ती म्हणजे सोनाली कुलकर्णी!

अंधविश्वासाला बळी पडून माणूस आपली माणुसकी विसरून जातो हे सत्य या वेब सीरिजचा मुख्य मुद्दा आहे. शेवटच्या भागात भोंदूबाबा जेव्हा म्हणतो, “आम्ही अशिक्षित पोटा-पाण्यासाठी लोकांना भुलवतो, पण तुम्ही शिक्षित लोक अडाण्यासारखे कसे भुलता?” तेव्हा आपण खरंच विचार करू लागतो आणि इथेच ही वेब सीरिज जिंकते.

गावाकडे अंधविश्वासाला बळी पडण्याचे प्रकार जास्त आहेत, पण शहरातही अनेक वेळा आपण जेव्हा संकटात सापडतो तेव्हा काही विचित्र प्रकार करतो. इथे आपला आत्मविश्वास महत्त्वाचा. ही मालिका नुसती करमणूक नसून डोळे उघडणारी आहे. त्यामुळे वेळ काढून ही मालिका बघा. कारण असल्या आशयघन मालिका येणं गरजेचं आहे.

[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

Comments are closed.