नागपूर स्फोटाचे विधिमंडळात पडसाद – स्फोटक पदार्थांची हाताळणी ऑटोमॅटिक आणि रोबोटिक, नियमात सुधारणेसाठी केंद्राकडे पाठपुरावा
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेत उमटले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अतिज्वलनशील पदार्थ हाताळण्याचे काम पूर्णपणे ‘रोबोटिक’ आणि ‘ऑटोमॅटिक’ करण्याचे विचाराधीन आहे. तसेच 2008 मधील स्फोटक कारखान्यासंबंधी नियमात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी आणि सचिन अहिर यांनी 93 अन्वये प्रस्ताव मांडून विधान परिषदेत चर्चा करण्याची मागणी केली, मात्र सभापती राम शिंदे यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. तसेच विषय गंभीर असल्याने सभागृहात मुद्दा मांडण्याची परवानगी दिली. विरोधकांनी यावेळी अतिज्वलनशील पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांच्या कारभारावरून सरकारला धारेवर धरले. 2018 पासून नागपूर परिसरात सोलर, चामुंडा आणि एसबीएलसारख्या कंपन्यांमध्ये सातत्याने होणारे स्फोट ही चिंतेची बाब आहे. कंपन्यांचे ऑडिट केवळ कागदावर होते की काय? असा सवाल करत त्यांनी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. राज्यातील वाढत्या घटना बघता या राज्याचे डिझास्टर स्टेट अशी ओळख होता कामा नये. यासाठी राज्यातील हाय रिस्क स्फोटक आणि रासायनिक कंपन्यांचे तत्काळ सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी आमदार सचिन अहिर यांनी केली.
व्यवस्थापकीय संचालकांसह 11 जणांना अटक
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर परिसरातील सर्व कंपन्यांचे ‘पेसो’ मार्फत ऑडिट करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. एसबीएल कंपनीतील दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी 21 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
Comments are closed.