‘अवतार’चा गेम ओव्हर! ‘एंडगेम’ने पुन्हा मारली बाजी
हॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ‘मार्व्हल’चा डंका वाजला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ने पुन्हा एकदा जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार’ला मागे टाकत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताब आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, हा पराक्रम नव्या रिलीजमुळे नव्हे, तर री-रिलीजच्या जोरावर ‘एंडगेम’ने करून दाखवला आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ची जगभरातील कमाई आता तब्बल 2.925 अब्ज डॉलर वर पोहोचली आहे. तर 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ची कमाई 2.923 अब्ज डॉलर आहे. म्हणजेच अवघ्या काही दशलक्ष डॉलरच्या फरकाने ‘एंडगेम’ने पुन्हा ‘अवतार’चा मुकुट हिसकावून घेतला आहे.
‘एंडगेम’मध्ये काही नवीन सीन्सची भर घालत तो ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम एनकोर’या नावाने पुन्हा थिएटरमध्ये आणण्यात आला. जुन्या सुपरहिरोंना पुन्हा पडद्यावर पाहण्याची संधी मिळताच चाहत्यांनीही थिएटरकडे धाव घेतली. त्याचा थेट फायदा चित्रपटाच्या कमाईला झाला. री-रिलीजमधून ‘एंडगेम’ने तब्बल 126 दशलक्ष डॉलर, म्हणजेच सुमारे 1,213 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. याच कमाईच्या जोरावर ‘एंडगेम’ने ‘अवतार’ला पुन्हा मागे टाकलं.
2009 मध्ये रिलीज झालेल्या ‘अवतार’ने जवळपास दशकभर जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावावर ठेवला होता. मात्र 2019 मध्ये ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ने थिएटरमध्ये एन्ट्री घेताच ‘अवतार’चा मुकुट हिसकावून घेतला. पण ‘अवतार’ही काही हार मानायला तयार नव्हता! 2021 मध्ये ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या रिलीजपूर्वी ‘अवतार’ पुन्हा थिएटरमध्ये आला आणि कमाईचा डाव पुन्हा फिरला. ‘अवतार’ने पुन्हा नंबर वनची खुर्ची पटकावली, तर ‘एंडगेम’ला दुसऱ्या क्रमांकावर जावं लागलं.
आता तब्बल पाच वर्षांनंतर ‘एंडगेम’ने पुन्हा कमबॅक करत ‘अवतार’ची गादी खाली खेचली आहे. या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसच्या या चुरशीत एक मजेशीर ट्विस्ट आहे. ‘अवतार’ 20th सेंचुरी फाॅक्सच्या बॅनरखाली रिलीज झाला होता. मात्र 2019 मध्ये फाॅक्सचे डिस्नेमध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे ‘अवतार’ नंबर वन असो किंवा ‘एंडगेम’कमाईचा फायदा शेवटी डिस्नेलाच!
Comments are closed.