महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल (Crude Oil) आणि विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफच्या (ATF Aviation Turbine Fuel) किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे सध्या देशातील हवाई वाहतूक क्षेत्र (Aviation Sector) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इराण आणि अमेरिका (Iran vs US War) यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलसह विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एव्हिएशन टर्बाइन फ्यूल’वर झाला आहे. इंधन महागल्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला असून, त्याचा भार तिकीट दरवाढीच्या रूपाने प्रवाशांवर पडत आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
एबीपी नेटवर्कच्या इंडिया@ 2047 या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी याबाबत वक्तव्य केलं. केंद्र सरकार या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एव्हिएशन सेक्टरला तब्बल 10,000 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज (Fund) देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे एअरलाइन्स आणि सरकारी तेल कंपन्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक बोजा कमी करणे हा या फंडचा मुख्य उद्देश आहे.
Aviation Turbine Fuel Rate : मागच्याच महिन्यात किमतीत 8.56 टक्के वाढ
देशात मागच्याच महिन्यात विमानाचे इंधन असणाऱ्या ATF च्या किमतीत 8.56 टक्क्यांची प्रचंड वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर एटीएफचा भाव प्रति किलोलीटर 96,638 रुपयांवरून थेट 1,04,927 रुपयांवर पोहोचला आहे.
भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा थेट फटका देशांतर्गत विमान कंपन्यांना आणि सरकारी तेल कंपन्यांना (OMCs) सहन करावा लागतो.
Domestic Flight Passenger Drop : देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत मोठी घसरण
या वाढत्या महागाईच्या काळात विमान कंपन्यांसमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिले आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्यांत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मंदी आणि वाढलेल्या तिकिटांमुळे विमान कंपन्यांना अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. एका आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मार्च महिन्याच्या तुलनेत 4.2 टक्क्यांनी घसरून 1.38 कोटींवर आली आहे.
Oil Companies Appeal : किमती न वाढवण्याचं तेल कंपन्यांना साकडे
या वाढत्या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी इंडियन एअरलाइन्सने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांसारख्या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातील युद्ध आणि तणावाची परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत देशांतर्गत विमानांसाठी (Domestic Flights) एटीएफच्या किमती वाढवू नयेत, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे. आता सरकारच्या 10 हजार कोटींच्या संभाव्य फंडमुळे विमान प्रवास स्वस्त होणार का आणि विमान कंपन्यांना कशा प्रकारे तातडीची मदत मिळणार, याकडे संपूर्ण उद्योग जगताचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.