विशेष – हिंदुस्थान धोकादायक वळणावर
>> अविनाश धर्माधिकारी
सध्या भारत देशही स्वातंत्र्यानंतरच्या एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जातो आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा अभ्यास करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना आतापर्यंत मला वाटत आलं आहे की, स्वतंत्र भारताच्या वाटचालीतलं सर्वात धोकादायक दशक 1980 चं दशक होतं. आज या दशकासारख्या भयानक कालखंडात आपण पुन्हा एकदा आहोत. कारण अचानक काही समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहेत. त्यांची एकमेकांशी मिलीभगत आहे. आतापर्यंत सुप्त वाटलेल्या अन्य फुटीरतावादी, भयानक हिंसक शक्यता आता डोकं वर काढत आहेत. आपल्याला भारत देश आणि भारतीय नागरिक या नात्यानं सावध राहत, प्रार्थना करत आणि आपल्या परीने काम करत हे चित्र पालटवून विकसित भारताच्या दिशेनं, ‘विश्वमित्र’ असलेल्या भारताच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे.
आपण एका अत्यंत धोकादायक कालखंडात आहोत. तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ते महाराष्ट्र, भारत आणि जग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’प्रमाणे लोकशाही पद्धतीत ठरावीक काळाने निवडणुका होतात. तशा आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ जाणलेले संत पुढं सांगतात – ‘हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’. पावसाळा दरवर्षी येत असला तरी तो कंटाळवाणा, दरवर्षीच्या वेळापत्रकातला नाही. उलट सृष्टी ज्या तऱहेनं काम करते, तिचं हे कौतुक आहे. तसं लोकशाहीचंही कौतुक म्हणजे निवडणूक. महाराष्ट्राची ती पार पडली आहे. मात्र धोक्यांचा उल्लेख करताना मी फक्त निवडणुकांबद्दल बोलतोय असं नाही. अटलजी म्हणाले होते तसं, निवडणुका येतील आणि जातील, सरकारं येतील आणि जातील. मात्र देश या सर्वांच्या वर असून तो चालला पाहिजे. मी म्हणत असलेला धोकादायक कालखंड हा देश चालवण्याच्या दृष्टीनं आहे.
माझं हे वैयक्तिक दुःख आहे की, ज्या महाराष्ट्राचं काम आहे देशासाठी काम करणं, लढणं, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रतिभेचा आविष्कार घडवणं, देशप्रश्नांवर मूलभूत अभ्यास करून त्यावर स्वतंत्र बुद्धीनं उपाय शोधणं; त्या महाराष्ट्राच्या समकालीन चित्राकडे, संस्कृतीकडे, सार्वजनिक जीवनाकडे बघताना हृदयाला हजारो इंगळ्या डसतात आणि प्रश्न पडतो की, महाराष्ट्राला झालंय तरी काय! म्हणून हा धोकादायक कालखंड आहे.
सध्या भारत देशही स्वातंत्र्यानंतरच्या एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जातो आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा अभ्यास करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना आतापर्यंत मला वाटत आलं आहे की, स्वतंत्र भारताच्या वाटचालीतलं सर्वात धोकादायक दशक 1980 चं दशक आहे. या दशकात ‘कार्यकर्ता’ म्हणून मी काम करत होतो. या कामाने दिलेल्या दृष्टीतून पुढे अभ्यास करून आयएएस झालो. या दशकात आपल्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही मागासलेली होती. आपल्या आर्थिक विकासाचा दर शरम वाटेल इतका कमी होता. आर्थिक धोरणं फसत होती. लोकसंख्या वाढत होती. लोकांच्या आशा-आकांक्षा-अपेक्षा वाढत होत्या. त्यांना आर्थिक विकास, त्याची गती पुरी पडत नव्हती. त्याच वेळी देशाच्या विविध कानाकोपऱयात फुटीरतावादी चळवळी डोकं वर काढत होत्या. बहुसंख्य फुटीरतावादी चळवळी दहशतवाद आणि हिंसेच्या मार्गाने चालल्या होत्या. आता हा देश तुटतो की काय? असं चित्र निर्माण झालं होतं.
याच दशकात जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादानं डोकं वर काढायला सुरुवात केली होती. दहशतवादी संघटना तयार होऊन त्यांचा बेदरकारपणा वाढत होता. या संघटनांना पाकिस्तानसहित अनेक भारतविरोधी शक्तींचा पाठिंबा होता. पंजाबमध्ये खालिस्तानची मागणी होऊ लागली. शीख संप्रदायाचा इतिहास भारत, भारतीय संस्कृतीसाठी, तिच्या संवर्धनासाठी लढण्याचा इतिहास असताना त्यातल्या काहींचं डोकं फिरलं, फिरवण्यात आलं की, “आम्ही वेगळे, सबब आम्हाला भारतापासून फुटून निघायचं आहे, नाहीतर आम्ही ‘भारतीयांच्या’ कत्तली करू.’’ मुळातला हसरा खेळता पंजाब, प्रचंड उत्साही पंजाब, आनंदी पंजाब, नाचणारा पंजाब, रंगीबेरंगी पंजाब, हिरवागार पंजाब, कष्टाळू पंजाब, तगडा पंजाब, खेळाडू पंजाब, भांगडा खेळणारा पंजाब बघता बघता सूर्यास्ताला स्मशानात रूपांतरित झालेला आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना डोळ्याने पाहिला.
भारताचा ‘पूर्वांचल’ आपापल्या कारणांमुळे खदखदत होता. आसाममध्ये बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची समस्या त्या काळात पेटली आणि त्यातून एक जन आंदोलन उभं राहिलं. ते जन आंदोलन शांततामय होतं. मात्र काही देशद्रोही, फुटीरतावादी शक्तींनी या आंदोलनाचा वापर करून आसामला भारतापासून वेगळं करण्यासाठी ‘उल्फा’ नावाची दहशतवादी संघटना स्थापन करून खूनखराबा सुरू केला. याही संघटनेला बांगलादेशातील काही शक्ती, चीन, पाकिस्तान यांच्या पाठिंब्यासहित त्याला जागतिक शीतयुद्धाची चौकट होती. मॅकमोहन रेषा चीनने मान्य न केल्यामुळे अरुणाचल सततचा धगधगत असायचा. नागालँडमध्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला तर 16 ऑगस्ट 1947 पासूनच सुरुवात झाली होती. बघता बघता ती सशस्त्र चळवळीत रूपांतरित झाली होती. तिला आधी पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश, चीन, शीतयुद्धकालीन राजकारणातली अमेरिका, त्यामुळे सीआयए आणि त्या भागात वावरणारे ख्रिश्चन मिशनरी या सगळ्यांची फूस होती. त्यातून वेगळ्या नागालँडची मागणी आणि त्यासाठी सशस्त्र लढा उभा राहिला होता. दुर्दैवाने मणिपूरमध्ये तेच, मिझोरममध्येही तेच.
अचानक आता पुन्हा दिसणं सुरू झालंय की, या सगळ्या समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहेत. त्यांची एकमेकांशी मिलीभगत आहे. आतापर्यंत सुप्त वाटलेल्या अन्य फुटीरतावादी, भयानक हिंसक शक्यता आता डोकं वर काढत आहेत. म्हणून मला असं वाटतं की, 1980 च्या दशकासारख्या भयानक कालखंडात आपण पुन्हा एकदा आहोत.
कश्मीरमध्ये कलम 370 तर रद्द झालं. त्यानुसार नव्याने निवडणुका झाल्या. लोकशाही प्रक्रिया पार पडली. मात्र देशद्रोही आणि फुटीरतावादी शक्ती तिथे खदखदत आहेतच. कश्मीरमधल्या निवडणुकांद्वारे दहशतवादी शक्ती विधानसभेत येणार की काय? याची शंका बाळगायला जागा आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ डोकं वर काढू पाहात आहे. खलिस्तानी चळवळीला जनमानसातून आधार नसला तरी या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतून निवडून आलेले दोन खासदार खुल्लमखुल्ला ‘खलिस्तान’वादी आहेत. त्यातला एक अमृत पाल सिंग तर तुरुंगात आहे. तरी त्याने निवडणूक लढवली आणि तो निवडून आला. देश फोडण्याची भाषा करणारे निवडून येत असतील तर दिसून येतं की, त्यांना निदान त्यांच्या मतदारसंघात जनाधार आहे. ही धोक्याची गोष्ट आहे. लोकसभेत खासदार म्हणून निवडले गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना देशाच्या एकात्मतेची, अखंडतेची आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यायची असते. तरीही ज्यांना खलिस्तान हवा आहे, असे दोघं संसदेत आहेत. या शक्तींना पाकिस्तानचा पाठिंबा आहे.
वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो याने पाठिंबा दिला आहे. खलिस्तानची मागणी करणाऱया राजकीय पक्षासोबत परवापर्यंत तो सत्तेत होता. आता त्याने तो पाठिंबा काढून घेतला असला तरी आपलं सरकार पडणार नाही याची काळजी घेतली आहे. कॅनडात खुल्लमखुल्ला वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा आहे. गेल्या वर्षी कॅनडातल्या कोलंबिया प्रांतातल्या सरे या ठिकाणच्या गुरुद्वारात हरदीपसिंग निज्जरची हत्या झाली तर कॅनडाचा पंतप्रधान म्हणतो, ही हत्या भारताने करवली. सध्या भारत-कॅनडा संबंध पूर्वी कधीही नव्हते इतके जास्त तणावपूर्ण आहेत. अर्थात कॅनडा हे त्याच्या स्वतंत्र बुद्धीतून हे करत नसून त्याच्या खांद्यावरून अमेरिकेने भारतावर रोखलेली ही बंदूक आहे. अमेरिकेच्या स्वतच्या राजकीय अपरिहार्यता आहेत. अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाचं राजकारण ढोबळमानाने भारतविरोधी आणि त्यात मोदी-भाजपविरोधी आहे. भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गुरुपतवंतसिंग पन्नूला अमेरिका संरक्षण देते. तो पन्नू ‘आये दिन सौ बार’ भारताविरोधात बोलत राहतो. आतासुद्धा तो “एअर इंडियाच्या विमानाने जाऊ नका. कारण आम्ही ती विमानं उडवून देणार आहोत’’, अशी उघड धमकी देताना दिसला. ही म्हणे अमेरिकेची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आहे! आता अमेरिका आपल्यावर आरोप करते की, भारताचा कुणी निखिल गुप्ता किंवा विकास यादव, जो पूर्वी रॉमध्ये होता, त्याने या पन्नूच्या हत्येचा कट रचला.
हे सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणातले पेच आहेत. अत्यंत निर्दयपणे हे राजकारण चालतं. भारतावर अनेक कारणांनी दबाव आणणं हा त्याचा उद्देश आहे. अमेरिकेला एका बाजूला चीनसमोर सक्षमपणे उभी राहू शकेल अशी शक्ती म्हणून भारत हवा आहे आणि त्याचबरोबर स्वतच्या ताकदीवर भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा राहील हे अमेरिकेला खपत नाही. अमेरिकेला जणू भारत तिच्या ताटाखालचं मांजर बनायला हवं आहे. तिकडे विस्तारवादी आक्रमक चीन आहेच. अरुणाचलवर आजही दावा करतच आहे. पाकिस्तानला पाठिंबा देत भारतविरोधी कारवायांना पाठबळ देतच आहे. लडाखमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष जरासा थांबून दोन देशांमध्ये सीमारेषेवर गस्त घालण्याचा निर्णय झाला असला तरी धोका कायम आहे. चालू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध. आता त्या युद्धात उत्तर कोरियाने स्वतचं सैन्य पाठवलं. नाटो किंवा ईयूचं सदस्यत्व द्या, अशी युक्रेनची मागणी आहे. या युद्धात आम्ही अणुबॉम्बचा वापर करू अशी धमकी पुतीन यांच्या रूपात एका देशाचा राष्ट्राध्यक्ष धमकी देतो. हे धोके कमी म्हणून की काय, 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायल-हमास युद्ध सुरू झालं. जाणाऱया दिवसागणिक या युद्धाची व्याप्तीदेखील वाढतच आहे. हमास, हिजबुल्ला यांच्या पाठीशी मुख्यत इराण आहे. येमेनमधल्या हौथी या शिया पंथीय संघटनेला इराणचा पाठिंबा आहे. ही संघटना इराणचं आखात किंवा लाल समुद्र यात चाचेगिरी करत व्यापाराला बाधा निर्माण करते. जगाचा फार मोठय़ा प्रमाणावरचा तेलाचा व्यापार या भागातून चालतो. यातून इस्रायल-इराण युद्ध पेटण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन इस्रायलला धमकी देतात की, तुम्ही इराणच्या अण्वस्त्रांना हात लावलात तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ! अमेरिका इस्रायलला सांगते (किंवा सांगितल्याचं नाटक करते) की, इराणच्या तेल विहिरींना काही करू नका. अशा वेळी तैवानवर आक्रमण करून तो ताब्यात घेण्याची तयारी चीन करत असल्याची शक्यता दिसते. दोन दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सेनेची पाहणी केली. त्यांनी केलेलं विधान आहे – युद्धासाठी तयार रहा! एका राष्ट्राध्यक्षाने केलेलं हे विधान वरवरचं आहे, असं मानून चालणार नाही. शी जिनपिंग कोणत्या युद्धाकडे बोट दाखवत आहेत? अशी सर्व जगाची कमालीची काळजीची स्थिती आहे.
तेव्हा महाराष्ट्र, भारत, जग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहे. त्यात मला जाणवतं की, भारताचा सध्याचा काळ 1980 प्रमाणे धोक्याचा आहे. या सर्व धोकादायक शक्यतांना बळ देणाऱया देशांतर्गत शक्ती आहेत. नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद या दोघांची एकमेकांशी मिलीभगत आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्त विमानांत बॉम्ब ठेवल्याचे मेसेजेस आले. एकाही विमानात असा बॉम्ब नसला तरी त्यातून उडणारा गोंधळ, विमानं रद्द होणं, उड्डाणांना विलंब होणं… भारतात गोंधळ उडवून देण्याची ही योजना आहे. रेल्वेचे मुद्दाम अपघात घडवून आणण्याचे देशभरात प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतं. रूळ जोडणारे नटबोल्ट काढा, रुळांवर मोठे दगड ठेवून रेल्वे घसरवण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसतात. रेल्वेच्या कामासाठी लागणाऱया डायनामाइट गोडाऊनमध्ये काम करणाऱया रेल्वे कर्मचाऱयाने ते डायनामाइट रेल्वे उडवून देण्यासाठी रुळांवर लावलं. आपली डय़ुटी संपवून घरी जाणाऱया एका कर्मचाऱयाला ते दिसलं. येणाऱया रेल्वेच्या दिशेने हातवारे करत तो पळत सुटला. रेल्वेच्या लोको पायलटला ते दिसलं आणि त्याने रेल्वेला ब्रेक लावला. तामीळनाडूमध्ये मात्र असा रेल्वे अपघात टळू शकला नाही. म्हणून देशांतर्गत घातपात घडवून आणू इच्छिणाऱया अनेक शक्ती काम करत आहेत. आपल्याला भारत देश आणि भारतीय नागरिक या नात्याने सावध राहात, प्रार्थना करत आणि आपल्या परीने काम करत हे चित्र पालटवून विकसित भारताच्या दिशेने, ‘विश्वमित्र’ असलेल्या भारताच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी आणि कायमच.
Comments are closed.