‘माझा पुरस्कार’मध्ये ‘भूमिका’ची बाजी, अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील दिमाखदार सोहळा

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील माझा पुरस्कार सोहळा बुधवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात रंगला. ‘भूमिका’ या नाटकाला तब्बल सात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशोक मुळ्ये यांच्या कोपरखळ्या, खुशखुशीत भाषण आणि त्याला मिळणारा त्यांच्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद यामुळे हा सोहळा रंगतदार झाला.

अशोक मुळ्ये दरवर्षी नव्या संकल्पना घेऊन कार्यक्रम करतात. ‘असेही एक नाटय़ संमलेन’, ‘माझा पुरस्कार’ हे त्यांचे विशेष उपक्रम आहेत. अगदी वन मॅन शो असाच हा सोहळा असतो. वयाच्या 82 व्या वर्षीही ते प्रचंड ऊर्जेने एक खांबी तंबू बनून कार्यक्रम आयोजित करतात. यंदाही त्यांच्या संकल्पनेतील हा अनोखा सोहळा रंगला. यंदाच्या ‘असेही एक नाटय़ संमेलन’चे अध्यक्ष अभिनेते शरद पोंक्षे, तर स्वागताध्यक्ष दिग्दर्शक विजय केंकरे होते. ‘भूमिका’ नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाटककार क्षितिज पटवर्धन, निर्माता  श्रीपाद पद्माकर, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री समिधा गुरू, सहाय्यक अभिनेता सुयश झुंजरके, नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांना ‘माझा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, निवृत्त मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता संजय मोने, अभिजीत खांडकेकर आदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

या वेळी ‘गाणी तुमच्या आवडीची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. केतकी भावे जोशी, शिल्पा मालंडकर, श्रीरंग भावे, जयंत पिंगुळकर निलीमा गोखले यांनी भावप्रधान श्रवणीय गीते सादर केली.  संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते.

‘भूमिका’ हे नाटक पाहिले आणि या नाटकाबरोबरच त्यातील सर्व कलाकारांना पारितोषिकांनी गौरविले पाहिजे असे माझ्या मनात आले. त्यातून यंदाचा विशेष ‘माझा पुरस्कार’ सोहळा केला. यंदाच्या पुरस्काराचे 20 वे वर्ष आहे. माझ्या प्रेमापोटी अनेक जण आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहतात, अशी कृतज्ञता अशोक मुळ्ये यांनी व्यक्त केली.

Comments are closed.