अक्षर पटेलशिवाय टीम इंडियाचे आयसीसी स्पर्धा जिंकणे कठीण! आकडेवारीच आहे थक्क करणारी

भारतीय पुरुष क्रिकेट संघ रविवारी (८ मार्च) तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक विजेता बनला. २०२६च्या टी२० विश्वचषक आवृत्तीत भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांनी उत्तम कामगिरी केली. भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल यानेही गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी केली. त्याने ३ षटकात २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत अक्षरने सात सामने खेळले आणि ते सातही सामने भारताने जिंकले. अंतिम सामना जिंकताच त्याच्या नावावर एक दुर्मिळ विक्रम झाला आहे. तो विक्रम मोडणे अशक्य आहे.
अक्षरने एक असा विक्रम केला आहे, जो त्यालाही माहित नसेल. त्याने मागील जेवढे २० आयसीसी सामने खेळले , ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत. याची सुरूवात २०२४च्या टी२० विश्वचषकाने झाली आणि ते २०२६च्या टी२० विश्वचषकापर्यंत सुरुच राहिले. त्याने २०२६च्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आणि संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली.
न्यूझीलंडविरुद्ध अक्षरने गोलंदाजीमध्ये कमाल केली. त्याने न्यूझीलंडची फलंदाजी फळीच उद्ध्वस्त केली. त्याने फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल यांना बाद केले. त्याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात दोन महत्वाचे झेल पकडत भारताचा विजय सोपा केला.
अक्षर २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळला. त्यामध्ये त्याने ५ विकेट्स घेतले असून त्याचा इकॉनॉमी रेट ४.३५ राहिला. २०२४च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही त्याने अष्टपैलू कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात अक्षरने ४७ धावा करताना एक विकेटही घेतली होती.
अक्षरने आतापर्यंत ४ मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा खेळल्या आहेत. त्यामध्ये २०२३च्या वनडे विश्वचषकाचा समावेश आहे. त्यामध्ये भारत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.
भारत तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. भारताने २००७मध्ये एमएस धोनी आणि २०२४मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी२० विश्वचषक जिंकला होता. हे दोघेही अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या २०२६च्या अंतिम सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित होते.
Comments are closed.