IND vs WI: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल? बुमराहऐवजी कोण घेणार जागा?
अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजला डावातच 140 धावांनी पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटीतही आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) कर्णधारपदाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत जबरदस्त खेळ दाखवला. के.एल. राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकं ठोकली, तर गोलंदाजीत मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) कॅरिबियन फलंदाजांच्या धडाधड विकेट घेतल्या. मालिकेचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल दिसू शकतात. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती मिळू शकते.
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन थोडी वेगळी दिसू शकते. पहिल्या सामन्यात 3 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला दिल्लीच्या सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला (Prasiddh Krishna) संधी मिळू शकते. कृष्णाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे आणि त्याने यावर्षी कसोटीतही चांगले प्रदर्शन केले आहे.
दिल्लीमध्ये साधारणपणे फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल नीतीश कुमार रेड्डीऐवजी (Nitish Kumar Reddy) अक्षर पटेलला (Axar Patel) संघात स्थान देऊ शकतो. अक्षरचा घरेलु मैदानावरचा विक्रम अफलातून आहे. त्याने भारतात खेळलेल्या 12 कसोटीत 47 विकेट घेतल्या आहेत. त्याने एका डावात पाच वेळा 5 विकेट घेतल्या आहेत, तसेच एका सामन्यात 10 विकेट घेण्याची कामगिरीही केली आहे. गोलंदाजीसोबतच अक्षर फलंदाजीमध्येही संघासाठी उपयोगी पडतो.
पहिल्या कसोटीत टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात फक्त 162 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 448 धावा केल्या. दुसऱ्या डावातही कॅरिबियन फलंदाजांना काही करता आले नाही आणि ते 146 धावांत सर्वबाद झाले.
Comments are closed.