अयोध्या दान प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांशी संबंधित कथित चोरी आणि अनियमिततेबाबतचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वकील अनूप अवस्थी यांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेण्याची आणि स्वतंत्र न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी एफआयआर नोंदवण्याची आणि न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तथापि, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तोंडी उल्लेख टाळण्याचा सल्ला देत लेखी विनंत्या सादर केल्यास प्रकरणाची निकड आणि प्राधान्यानुसार विचार केला जाईल, असे म्हटले आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. एसआयटीमध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी विजय विश्वास पंत, आयपीएस अधिकारी किरण एस. आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. ही समिती दानपेट्या आणि दानाच्या रकमेसंबंधित आरोपांची चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
Comments are closed.